नागोठणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या आषाढी एकादशी निमिअखंडत्त नागोठणे येथील जोगेश्वरी मंदिर परिसरात असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येथील वारकरी संप्रदायातील तसेच इतर भाविकांनी सकाळपासूनच विठू माऊली चे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती.
यावेळी नागोठणे येथील श्री संत सेवा मंडळाचे अध्यक्ष रतन हेंडे व समितीतील सर्व सदस्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यानुसार पहाटे ४ ते ६.३०पर्यंत माऊलीची काकड आरती घेतली व नंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचे अभिषेक करण्यात आले. लाडक्या विठू माऊली चे दर्शन घेण्यासाठी नागोठणे येथील होली एंजल स्कूल तसेच भारतीय एज्युकेशन च्या एस.डी. परमार स्कूलच्या विध्यार्त्यांनी वारकरी संप्रदायाचा गणवेश परिधान करून आपल्या शाळेपासून दिंडी काढुन विठ्ठल रुख्मिणी मंदिरात छोट्या वारकरी भक्तांनी हजेरी लावली होती. यावेळी या छोट्या वारकऱ्यांचे श्री संत सेवा मंडळाच्या वतीने फुले देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना प्रसाद म्हणून केळी व लाडू देण्यात आले.
आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायातील भक्तांचा एक अविस्मरणीय दिवस. या दिवशी माऊलीचे सर्व भक्त हे नामस्मरणात गुंतलेले असतात. या उद्देशाने नागोठणे विभागीय पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील तरुण, ज्येष्ठ वारकऱ्यांनी श्री संत सेवा मंडळ ज्ञानेश्वर मंदिरात एकत्रित येऊन स.१०ते दु.१ या वेळेत सामुदायिक भजन केले. या भजनाने संपूर्ण मंदिर परिसर हा विठूमय होऊन विठ्ठल नामाने दुमदुमून निघाला होता. नंतर सर्व भक्तांनी केळी, खिचडी व राजगिरा लाडू याचा प्रसाद म्हणून फराळ केला.
दरम्यान आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या अनुषंगाने नागोठणे येथील विठ्ठल भक्तांनी सढळ मनाने देणगी दिली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर जवके यांनी सर्व भक्तांना खिचडीचा फराळ दिला, तर नागोठणे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्या सुप्रिया संजय महाडिक, मोहित प्रोव्हीजन स्टोअर, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते प्रथमेश काळे, डॉ. अभिषेक शहासणे , संतोष जाधव, पोलीस हवालदार विनोद पाटील यांनी केळी वाटप केले. त्याचबरोबर सत्यभामा ठोंबरे व मनोज वाघमारे यांनी जमलेल्या भक्तांना राजगिरा लाडूचे वाटप केले. शेवटी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हभप विजय महाराज शहासणे यांनी विठ्ठल भक्तांसाठी सुश्राव्य असे प्रवचन केले व हरिपाठ करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.