नागोठणे पोलीसांची चमकदार कामगिरी अवघ्या बारा तासाच्या आत मोबाईल चोराला घातल्या बेड्या
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली पो.ह. महेश लांगी व पो.ह. जी.पी.पाटील यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या सहाय्याने तांत्रिक तपास करीत चमकदार कामगिरी करून सुमारे ४० हजार किंमतीचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला अवघ्या बारा तासाच्या आतच दि.२७ रोजी सकाळी बेड्या घालत जेरबंद केला.
नागोठणातील सुप्रसिद्ध कल्पना हॉटेल दि. २५ जून वेळ सायं. ६.३० वाजण्याच्या सुमारास नागोठणे नोकरी निमित्त राहणारा युवक राहूल प्रकाश जाधव वय - २२ वर्षे हा नाश्ता करण्यासाठी हॉटेल मध्ये आला होता. याचवेळी कोणी अज्ञात व्यक्तीने राहूलचा सॅमसंग कंपनीचा सुमारे ४० हजार किंमतीचा मोबाईल राहूलची नजर चुकवून लबाडीने मोठ्या शिताफीने हातचलाखी करून चोरुन नेला. ही बाब राहूल जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर आपला मोबाईल कोणीतरी चोरी करून नेला असल्याची खात्री होताच त्यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात रात्री उशिरा धाव घेत तक्रार दाखल केली.यावेळी या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन सपोनि संदिप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या मदतीने तांत्रिक तपास सुरु केला आणि अवघ्या बारा तासाच्या आतच मोबाईल चोरणाऱ्या सुबाला उदयनाथ भोई (मुळ रा. भिमकेला, उडिसा) याला नागोठणे जवळील मौजे वरवठणे गावाच्या हद्दीतील एल अँड टी लेबर कॉलनी येथून अटक करण्यात आली असून आरोपीकडून मोबाईल हस्तगत करण्यात नागोठणे पोलीसांना यश आले. नागोठणे पोलिसांच्या या चमकदार कामगिरचे शहर व विभागात कौतुक होत आहे.