संगणक परीचालकांना न्याय मिळवून देणारच - राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांचे प्रतिपादन
● ग्रामसेवक झालो तरी संगणक परीचालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध - राज्यसचिव तथा रायगड जिल्हा अध्यक्ष मयुर कांबळे
● राज्यसचिव तथा जिल्हा अध्यक्ष मयुर कांबळे यांचा रायगड जिल्हा संघटने तर्फे भव्यदिव्य सत्कार
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
राज्यभरात सातत्याने मागील 11 वर्ष संगणक परीचालकांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लढा दिल्याबद्दल आणि रायगड जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक या पदावर पुनरनियुक्ती मिळाल्याबद्दल संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हा अध्यक्ष मयुर कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना संलग्न रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेकडून भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांचे हस्ते राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राज्यात मागील 11 वर्षांपासून जवळपास 22 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक मानधन तत्त्वावर काम करीत आहेत. ग्रामपंचायतिचा सर्व डेटा ऑनलाइन करणे आणि डिजिटल सेवा पुरविणे या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व संगणक परीचालकांना सुधारित आकृती बंधानुसार पद निर्मिती करून कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेणे व अन्य काही मागण्या मान्य करणे यासाठी 11 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना लढा देत आहे. या संघटनेचे माध्यमातून राज्यातील सर्व संगणक परीचालकांना न्याय मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी केले आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेलं मयुर कांबळे यांनी मागील 11 वर्षात संगणक परीचालकांचे अनेक प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर लढा दिलेला आहे. ग्रामपंचायत मध्ये काम करणारे एक संगणक परिचालक ते रायगड जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक पदी नियुक्ती मिळणे या प्रवासात त्यांनी अनेक अडचणींना धिरोदात्तपणे तोंड दिलेले आहे त्यामुळे त्यांचे हे काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे मुंडे यांनी सांगून सर्व संगणक परीचालकांनी एकसंघटित राहून शासनाकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्य संघटनेला सहकार्य करावे असे आव्हाहन राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी केले आहे.
सत्कार मूर्ती राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे यांनी सांगितले की आपल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर रायगड जिल्ह्यासह राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसंदर्भात नागपूर मोर्चा असो किंवा मुंबईत आझाद मैदानावरील आंदोलन असो अशा प्रत्येक वेळोवेळी सहकार्य केले तसेच पंचायत समितीचे अधिकारी वर्ग ते मंत्रालयातील संबंधित खात्याचे उच्च अधिकारी वर्ग यांनी देखील अनेक वेळा योग्य मार्गदर्शन केले म्हणूनच संघटनेसाठी चांगले काम करू शकलो असे सांगून मला आता जरी रायगड जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक या पदावर पुनरनियुक्ती मिळाली असली आणि जरी मी ग्रामसेवक झालो असलो तरीही ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन असे राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे यांनी सांगितले.
यावेळी राज्यभरातून उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे यांचे संगणक परिचालकांसाठी असलेले योगदान आणि त्यांचे कामाचा गौरव करून ग्रामसेवक पदावर पुनरनियुक्ती मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजित सत्कार कार्यक्रमासाठी राज्यातील पुणे, लातूर, सोलापूर, नाशिक, धुळे, हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी, यांसह रायगड जिल्ह्यातील संगणक परिचालक, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेतर्फे भव्य दिव्य सत्कार कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्हा संघटनेचे सल्लागार श्रीकांत बिरवाडकर आणि महाड तालुका संगणक परिचालक संघटनेचे माजी सचिव परीक्षित साळुंखे यांनी केले तर आभारप्रदर्शन महाड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सोंडकर यांनी केले.