श्रीवर्धनमध्ये जलजीवन योजनेत कोटींचा चुराडा
कोटींची योजना तरीही डोक्यावर हंडा
नागलोली, चिखलप ग्रामपंचायतच्या गावांची बिकट अवस्था
रायगड वेध संजय प्रभाळे बोर्लीपंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत गेल्या दोन वर्षापासून पंच्चावन जलजीवन मिशन योजना पूर्ण होत आहेत. यामध्ये कोटींचा खर्च होऊन सुद्धा महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला नाही. सध्या भर उन्हात गावाच्या विहिरीतून डोक्यावरून घरात पाणी नेल्या शिवाय पर्याय उरल नाही.
नागलोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या धनगरमलई, मधलीवाडी, नागलोली, नवीवाडी, देवखोल, बोर्ला व बोर्ला रसाळवाडी या गावांना गेली कित्येक वर्ष भासत असणारी पाणी टंचाई यावेळी 1 कोटी 84 लाख जलजीवन मिशन योजनेतून दूर करण्यात आली. मात्र, सद्या याच योजनेतील पाणी पुरवठा लोकांपर्यंत पोचण्यासाठी अनेक अडथळे येत आहे. दिवसाआड होत असलेला पाणी पुरवठ्यात पाईप लाईन जोडणीतील बिघाड हे नेहमीचच ठरले आहे. त्यामुळे या दुर्गम भागातील पाणी टंचाईचे सावट कायम असून कोटी रुपयांची जलाजीवन योजना येथील नागरिकांसाठी निरुपयोगी ठरली आहे.
त्याचप्रमाणे चिखलप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या शिरवणे गावात नुकतीच जलजीवन मिशन ची पाणी योजना राबवली. मात्र 19 लाखांची योजना राबवून देखील गावकऱ्यांना पाण्याची उपेक्षाच राहिली आहे. सध्या गावाच्या विहिरीतून डोक्यावरून घरात पाणी नेले जाते. चिखलप ग्रामपंचायत अंतर्गत चिखलप, हुनरवेल, शिरवणे, पुनिर आणि आदीवासी वाडी आशा गाववाड्यांचा समावेश आहे. शिरवणे गावात साधारणपणे सातशे लोकसंख्या आहे. योजना राबवून देखील घराघरात पाणी येत नसल्याने भर उन्हात तहान कशी भागणार असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.
हर घर जल नाहीच -
शिरवणे गावासाठी नळाद्वारे पाणी येत नाही याचे कारण वीज बिल थकीत असल्याचे कळले. मात्र, नुकतीच जलजीवन मिशन द्वारे पूर्ण झालेल्या योजनेद्वारे घराघरात पाणी मिळत नसल्याचे येथील महिलांनी सांगितले. हर घर जल असे योजनेचे घोषवाक्य असलेल्या या योजनेचे मूळ उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे दिसते.
नागलोली येथील जलजीवन योजनेसाठी आठ किलोमीटर अंतरात पाईप लाईन जोडण्यात आली. मात्र, नेटवर्क साठी केबल टाकताना अनेक ठिकाणी पाईप लाईन ला धक्का लागला आहे. त्यामुळे रोज लिकिज होत असल्याने पाणी पुरवठा होत नाही.
मिलन काते, उपसरपंच नागलोली.
अधिकारी भलतंच कारण सांगतात -
शिरवणे गावाच्या नळजोडणीच्या पंपाचे वीजबिल थकीत असल्याचे काही प्रकरण आहे. मात्र याबाबत नक्की माहिती घ्यावी लागेल.
- युवराज गांगुर्डे, उपविभागीय अभियंता, म्हसळा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग