म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार..!
● 15 वर्षानी घड्याळाची साथ चिखलप कुणबीवाडी ग्रामस्थांनी सोडली
● आमदार भरतशेठ गोगावले यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
● खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचे काम करीत रहावे, आम्हाला आमचे काम करू द्यावे - आमदार भरतशेठ गोगावले यांचे सूचक वक्तव्य
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यात अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोबत असलेल्या एका गावाने अखेर 14 वर्षाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
म्हसळा तालुक्यातील कुणबी समाजाचे नेते तथा पंचायत समितीचे माजी सभापती स्व.एस.डी.शिंदे यांचे मूळगाव असलेले चिखलप कुणबीवाडी गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकास कामे करण्याची पद्धत व धाडसी निर्णय घेण्याचे कृतीने प्रेरित होऊन आणि शिवसेना पक्षाचे प्रतोद तथा आमदार भरतशेठ गोगावले यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि जिल्हा सहसंपर्क प्रमुख पाटेकर यांचे विशेष प्रयत्नाने गुरुवार, दि.13 एप्रिल 2023 रोजी शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश केला आहे.
जवळपास 650 पेक्षा जास्त मतदान असलेल्या चिखलप कुणबीवाडी ग्रामस्थांनी एकमुखाने शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडली असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांना हा जबरदस्त हादरा असल्याचे बोलले जात आहे.
चिखलप कुणबीवाडी गावात आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी शिवसेना पक्षाचे प्रतोद तथा आमदार भरतशेठ गोगावले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की राज्यात सध्या शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालेले असून मागील काही महिन्यांपासून सरकार वेगवान निर्णय घेऊन गतिमान पद्धतीने काम करीत आहे त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात तालुक्यात नागरिक मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात दाखल होत आहेत. खासदार सुनिल तटकरे आणि माजी पालकमंत्री तथा आमदार आदिती तटकरे या शिंदे - फडणवीस सरकार मार्फत मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचे भूमिपूजन करून खोटे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत असून आता ही धडपड कशासाठी करीत आहात आणि तुमची सत्ता असताना विकासकामे करण्यासाठी तुमचा हात कोणी अडविला होता का ? असा खरमरीत सवाल आमदार गोगावले यांनी खासदार तटकरे यांना उपस्थित केला आहे. आम्ही दुसऱ्याचा बापाला, आमचा बाप म्हणत नाही.. त्यामुळे आमचे सरकार मार्फत मंजुरी मिळालेल्या कामांचे श्रेय आम्हीच घेणार असे ठणकावून सांगितले तर तटकरे यांनी त्यांचे पक्षाचे माध्यमातून जी कामे मंजूर होतील त्यांचे भूमिपूजन व उदघाटन खुशाळपणे करावे आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचे विरोध करणार नाही परंतु आमचे कामात ढवळाढवळ करू नये असे सांगून खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचे काम करीत रहावे आणि आम्हाला आमचे काम करू द्यावे असे मत आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केले. चिखलप कुणबीवाडी गाव या अगोदर तुम्ही ज्या पक्षात होतात त्यांनी तुमची 15 वर्षे दिशाभुल केली.परंतु या पुढे तुमच्या गावचा विकास शिवसेना करणार आहे. आम्ही इतरांसारखी आश्वासने देत नाही तर कृती करतो. त्यामुळे तुम्ही निश्चित रहा अशी ग्वाही ग्रामस्थांना या पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली.
त्याचबरोबर आमचे सरकारने एसटी महामंडळचे बसने प्रवास करणे यासाठी वय वर्ष 75 पेक्षा जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांसाठी पन्नास टक्के प्रवास भाडे, पीएम किसान योजनेत राज्य सरकार कडून वाढीव सहा हजार रुपये, शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा पॉलिसी काढणे असे महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले, त्याचबरोबर गावागावात विकासकामे करण्याबरोबर श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात आगामी काळात तरूणांसाठी रोजगार व महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यावर भर राहील असे आमदार गोगावले यांनी सांगितले.
आगामी काळात श्रीवर्धन मतदारसंघासह म्हसळा तालुक्यातील अनेक गावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत असे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ प्रमुख सचिन पाटेकर यांनी सांगितले.
चिखलप कुणबीवाडी अध्यक्ष सुडक्या जाधव, उपाध्यक्ष संतोष शिंदे, उपसचिव राजेंद्र जाधव, मुंबई मंडळ अध्यक्ष शंकर मुंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण वाघे, ग्राप सदस्य मयुर पाखड, महिला अध्यक्ष स्मिता हसमुख शिंदे, तानु मुंडे यांसह चिखलप कुणबीवाडीचे ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी जाहीर प्रवेश केला आहे. सर्व प्रवेश कर्त्यांचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले. पक्षप्रवेश कार्यक्रम वेळी शिवसेना पक्ष प्रतोद तथा आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, पाभरे गण विभाग प्रमुख दिपेश जाधव, उपविभाग प्रमुख अरविंद शिंदे, वरवठणे गण विभाग प्रमुख नामदेव घुमकर, महिला उपतालुका प्रमुख रिना सुतार, यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याचे राजकारणात तटकरे घराण्यात एक खासदार आणि दोन आमदार तसेच अनेक वर्ष मंत्रिपद असताना देखील मागील 15 वर्षांपासून आम्ही चिखलप कुणबीवाडी ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून गावातील विकास कामे न झाल्यामुळे आणि शिवसेना पक्षाचे प्रतोद तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्यांचा मतदारसंघ नसताना देखील आमच्या गावाला जोडणारा मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे करिता निधी उपलब्ध करून दिला आहे, तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत व अन्य छोटी मोठी कामे करून देणार आहेत त्यामुळे आम्ही सर्व चिखलप कुणबीवाडी ग्रामस्थ महिला भगिनी, मुंबई मंडळासह शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहोत, असे चिखलप कुणबीवाडीचे उपाध्यक्ष संतोष शिंदे, ग्राप सदस्य प्रविण वाघे यांसह अन्य ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले