Type Here to Get Search Results !

नागोठणे येथे संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी


नागोठणे येथे संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

रायगड वेध अनिल पवार नागोठणे 

नागोठणे शहरातील कुंभारआळी येथील श्री गणपती - हनुमान मंदिरात  कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी श्री संत अलिबागकर महाराज यांच्या आशीर्वादाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंगळवार दि. १८ एप्रिल रोजी कुंभार समाज बांधवांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीत लहानग्या मुलांनी विविध वेशभूषा साकारत सहभागी झाले होते. संतकवी गोरोबा काका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर येथे इ.स.१२६७ साली झाला. संत गोरोबा काका हे पांडुरंगाचे असिम भक्त होते. मात्र अवघ्या पन्नासाव्या वर्षी आपल्याच गावी तेर येथे गोरोबा काकांनी १३१७ मध्ये समाधी घेतली होती.

मंगळवारी सकाळी ५ वा. उन्नती महिला मंडळ कुंभारआळी यांच्या पहाटेच्या काकड आरतीने संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात झाली. नंतर ग्रामस्थ मंडळ कुंभारआळी यांच्याकडून सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान कळस स्थापना करण्यात आले. सकाळी ९ वा. पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने कुंभारआळी समाज बांधवांनी दिंडी सोहळा आयोजित केला होता. या दिंडी सोहळ्याची सुरुवात कुभारआळी येथील श्री गणपती - हनुमान मंदिरातून होऊन नंतर गांधी चौक मार्गे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसरातील श्री ज्ञानेश्वर मंदिरातून पुन्हा श्री क्षेत्र कुंभारआळी येथे आल्यानंतर या दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली. यानंतर नागोठणे येथील संत सेवा मंडळाचे भजन झाले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कडसुरे येथील विलास महाराज शिंदे यांच्या उपस्थितीत संत गोरोबा काका यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. याचबरोबर संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुंभारआळी ग्रामस्थांच्या वतीने श्री सत्यनारायणाच्या महापूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वरप (ता. पेण) येथील ह.भ.प. भास्कर महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तकृपा हरिपाठ मंडळाचे हरिपाठ संपन्न झाला. तदनंतर रात्री ८ वा. ग्रामस्थ मंडळ कुंभारआळी यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद ठेवण्यात आला होता. यावेळी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शेवटी रात्री ९.३० वा. खेड (जि. रत्नागिरी) येथील किर्तनकार हे.भ.प. गणेश महाराज शिगवण यांचे सुश्राव्य किर्तन झाले. 

दरम्यान रात्री शिवसेना नेते मा. जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन तसेच ग्रामपंचायत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी नागोठणे येथील श्री क्षेत्र कुंभारआळी येथील श्री गणपती - हनुमान मंदिरात संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनोभावे दर्शन घेतले. संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय नागोठणेकर, उपाध्यक्ष मोहन नागोठणेकर, सचिव सुधिर वाडेकर, खजिनदार संजय कोल्हाटकर, सहखजिनदार मनोज गायकवाड, सहसचिव किशोर नागोठणेकर, सुर्यकांत गायकवाड यांच्यासह सर्व कुंभार समाज बांधवांनी मेहनत घेतली.
याचबरोबर नागोठणे येथील केएमजी विभागातील सर्व ग्रामस्थांनी सहभागी होऊन कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test