रिलायन्स कंपनी मधील पगार वाढीचा करार कामगारांच्या मर्जीनेच होणार अन्यथा. - भारतीय श्रमिक शक्ती संघ संघटनेचा इशारा
नागोठणे युनिटच्या अध्यक्षपदी संजय काकडे यांची एकमताने निवड
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
नागोठणे येथील रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवार अन्याय होण्यास सुरवात झाली. कामगारांना कंपनी मध्ये अनेक प्रश्न भेडसावत असताना कामगारांवार होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच कामगारांचे हितासाठी नागोठणे रिलायन्स कंपनी मध्ये गेल्या वर्षी भारतीय श्रमिक शक्ती संघ या संघटनेची स्थापना करण्यात आली. आमची संघटना खरोखरच कामगारांचे विविध प्रश्न सोडवित असल्याची कामगारांना जाणीव झाल्यानंतर कंपनीतील अनेक कामगार आमच्या संघटनेशी जोडले जात असल्यामुळे आमचाही उत्साह वाढला असुन येत्या नोव्हेंबर महिन्यात रिलायन्स कंपनीतील कामगारांचा पगार वाढीचा करार लागू होणार असुन हा करार कामगारांच्या हिताचा व त्यांच्या मर्जीनेच होणार अन्यथा आम्ही कंपनी व्यवस्थापनाला कायद्याचा बडगा दाखविल्या शिवाय शांत बसणार नाहीत असा इशारा भारतीय श्रमिक शक्ती संघ संघटनेचे केंद्रीय कमिटी अध्यक्ष कामगार कायद्याचे अभ्यासक ऍड.नितीन शिवकर, केंद्रीय कमिटी कार्याध्यक्ष कामगार नेते दिपक रानवडे व केंद्रीय कमिटी सरचिटणीस जीमी डे यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान श्रमिक शक्ती संघ संघटना नागोठणे युनिटचे अध्यक्ष निलेश नाईक यांचे अकस्मात निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर रिलायन्स कंपनीतील गॅस क्रॅकर प्लॅन्टचे प्रामाणिक होतकरु आदर्श कामगार संजय काकडे यांची अध्यक्षपदी व पीपी प्लॅन्टचे कामगार सुधीर पारंगे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.
शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी सायं. ७ वा. नागोठणे येथील इंद्रप्रस्थ हॉटेलच्या सभागृहात भारतीय श्रमिक संघ कार्यकारणी बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांना माहिती देताना ऍड. नितीन शिवकर, दिपकभाई रानवडे व जीमी डे बोलत होते. या वेळी नागोठणे युनिटचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय काकडे, उपाध्यक्ष प्रकाश मोरे, सरचिटणीस प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष अशोक भोय, सल्लगार मारुती दांडेकर, सुभाष खराडे, ऍड.महेश पवार आदींसह संघटनेचे प्रमुख सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना कामगार नेते चंद्रकांत अडसुळे यांनी केली. यावेळी कारवान ट्रॅव्हल्स कामगार संघटना, रिलायन्स कंपनीचे कामगार संजय शिर्के, कमलाकर डिकळे व नरेश म्हात्रे आदी भारतीय श्रमिक संघ संघटनेत सामील झाले. दरम्यान यावेळी कामगार नेते चंद्रकांत अडसुळे व भारती सिंगासने यांची संघटनेच्या केंद्रीय कमिटी वर नियुक्ती करण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना कामगार नेते दिपक रानवडे म्हणाले कि, कामगारांचे निवृतीचे वय ५८ वर्षावरून ६० वर्ष करावे, सन १९८९/९० साली भरती झालेले कामगार आता रिलायन्स कंपनी मधून निवृत्त होत असतानाच गेल्या १० वर्षात कंपनी व्यवस्थापनाने कामगार भरती केली नाही. अशा वेळी कंपनी व्यवस्थापनाने नवीन कामगार भरती तात्काळ करावी मात्र नवीन भरती करीत असताना या भरती मध्ये सामावून घेण्यामध्ये निवृत्त कामगारांच्या मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे, कामगारांना चांगल्या पद्धतीने पेन्शन द्यावे अश्या आमच्या कंपनी व्यवस्थापनाकडे मागण्या असुन १०० टक्के आमच्या मागण्या कंपनी व्यवस्थापनाला मान्य कराव्याच लागतील कारण आमचा आमच्या ताकदीवर पुर्ण विश्वास असल्याचे भारतीय श्रमिक शक्ती संघ संघटनेचे केंद्रीय कमिटी अध्यक्ष कामगार कायद्याचे अभ्यासक ऍड.नितीन शिवकर, केंद्रीय कमिटी कार्याध्यक्ष कामगार नेते दिपक रानवडे व केंद्रीय कमिटी सरचिटणीस जीमी डे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.