नागोठणे जवळील सुकेळी येते सुमारे २२ हजारांचा गुटखा जप्त;
आरोपीस अटक करण्यात नागोठणे पोलिसांकडून टाळाटाळ
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
अवैध गुटखाविक्रीला राज्यात बंदी असतानाही नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केले असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करत असतानाच नागोठणे विभागातील सुकेळी येथे राजरोसपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुकेळी येथील भावेश डिपार्टमेंटल स्टोअर या किराणा मालाच्या दुकानात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या व नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असलेल्या विमल कंपनीच्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड यांना सुयश आले आहे. सुकेळी येथील भावेश दिलीप मोदी यांच्या भावेश डिपार्टमेंटल स्टोअर या एका होलसेल किराण मालाच्या दुकानातून गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल २२ हजार रुपये किंमतीचा अवैध गुटखा साठा दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून जप्त करण्यात आला. मात्र यातील मुख्य आरोपी भावेश दिलीप मोदी याला अटक करण्यात नागोठणे पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत असून पोलिस निरीक्षक राजन जगताप यांच्या या भूमिकेवर सामान्य नागरिकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण यांना मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी भावेश दिलीप मोदी (वय-२५ वर्षे) रा. वाकण फाटा ता. रोहा, जि.रायगड यांच्याकडून दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या व आरोग्यास अपयकारक असलेला तंबाखूजन्य गुटखा हा स्वतःच्या फायदा करिता तो चालवत असलेल्या भावेश डिपार्टमेंटल स्टोअर या किराणा मालाचे दुकानात विक्री करिता ठेवलेला असताना तसेच जवळ बालगले स्थितीत मिळून आला म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण अलिबाग-रायगड विभाग केलेल्या कारवाईत केसरयुक्त विमल पान मसाल्याचा सुमारे २२ हजार रुपये किंमतीचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला असून आरोपी विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असूनही यातील मुख्य आरोपी भावेश दिलीप मोदी याला नागोठणे पोलिसांकडून दोन दिवस उलटूनही अद्यापही अटक करण्यात आली नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपी भावेश दिलीप मोदी याला अटक करण्यासाठी नागोठणे पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी अहवालात नमूद कारणास्तव होत असलेल्या दिरंगाईमुळे नागोठणे पोलिसांविरुद्ध परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात येत असताना जर या ठिकाणी सामान्य नागरिकांवर कारवाई तसेच त्यास अटक करण्याची असल्यास पोलिसांची जी कार्य तत्परता असते ती या प्रकरणी लागू होत नाही का? तसेच यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न सुज्ञ नागोठणे विभागातील नागरिकांना पडला आहे. तसेच यातील आरोपी भावेश दिलीप मोदी याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी नागोठणे येथील एका पक्षाचा स्थानिक नेता पोलिसांवर दबाव आणत असल्याचे खात्रीलायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण अलिबाग, रायगड यांच्यावतीने नागोठण्यात येऊन जर ही कारवाई करण्यात आली असेल तर मग अशा वेळी नागोठणे पोलिस आरोपीस अटक करण्यात टाळाटाळ का करत असताना आरोपीस अभय तर देत नाहीत ना? तसेच आरोपीस अटक करण्यास नागोठणे पोलिस मुहूर्त तर शोधत नाहीत ना? तसेच नागोठणे येथील त्या एका पक्षाच्या नेत्याला घाबरून हि अटक मुद्दामहून टाळत आहेत का? असे अनेक प्रश्न तसेच यासंदर्भात नागोठणे पोलिस निरीक्षक राजन जगताप कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत दोषी असलेल्या आरोपी भावेश दिलीप मोदी यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात अटकपूर्व वैद्यकीय तपासणी केली असता भावेश हा अनफिट असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याने त्याला तत्काळ अटक करण्यात आली नाही मात्र आता भावेश याला अटक करण्यात येणार आहे.
- राजन जगताप
पोलिस निरीक्षक नागोठणे
-----------------------------------------------
नागोठणे पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी आणलेल्या भावेश दिलीप मोदी याची वैद्यकीय तपासणी करत असताना त्याने सांगितले की त्याच्या छातीत दुखत सांगितल्याने त्याला अनफिट असल्याचा दाखला देण्यात आला होता. मात्र वास्तविक पाहता नागोठणे पोलिसांनी भावेश यास पुन्हा वैद्यकीय तपासणी करिता आणायला हवे होते परंतु त्यांनी दोन दिवस उलटूनही अद्याप भावेश यास वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य केंद्रात आणले नाही.
डॉ. आदित्य शिरसाट - वैद्यकीय अधिकारी
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र
--------------------------------