नागोठण्यात एअरटेल इंटरनेट केबल जमीनीत टाकण्याच्या कामात ठेकेदाराची मनमानी सुरुच
सुट्टीच्या दिवशी पुन्हा काढला कामाचा मुहूर्त ; स्थानिक प्रशासन हतबल
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
नागोठण्यातील फॉरेस्ट ऑफिस जवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर स्व. बाळासाहेब ठाकरे वसाहत शांतीनगर भागातील मुख्य रस्त्यापासून श्री साई सिनेमा टाॅकिज लगत असलेल्या मोबाईल टाॅवर पर्यंत एअरटेल कंपनीच्या इंटरनेट केबल जमीनीत टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी बंद केलेले काम गुरुवारी दि. ३० रोजी श्रीराम नवमीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाला सुट्टी असल्याने तो मुहूर्त साधत जोमाने सुरू केले आहे. मात्र हे काम करत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ऑप्टिकल फायबर केबल संदर्भातील शासन नियमानुसार जमिनीत सुमारे एक मीटर खोदकाम करुन फायबर केबल टाकायची असते, परंतु महाड-पोलादपूर येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी असणाऱ्या संबंधित ठेकेदारांनी नागोठणे येथील एका रोहा तालुका भाजपा पदाधिकाऱ्याला हाताशी धरून नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयाकडून कामासंदर्भातील नाहरकत दाखल्यात देण्यात आलेल्या नियम व अटी धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू ठेवत ग्रामपंचायतीच्या पूर्वस्थित गटारातून तसेच पेव्हर ब्लॉक पासून तयार करण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या कडेला वरच्यावर ही फायबर इंटरनेट केबल टाकण्याचे काम ठेकेदाराच्या कामगारांकडून सर्रासपणे सुरू आहे. पूर्वस्थित गटारातून परवानगी नसतानाही ठेकेदाराच्या मनमानीने त्याचे कामगार इंटरनेट केबल गटारातून टाकण्याचे काम करत असल्याने गटारांचेही मोठ्या नुकसान झाले असून यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून याचा नाहक त्रास येथील नागरिकांना तसेच येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना होणार आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील हायवेनाका येथून ही इंटरनेट केबल टाकण्याचे काम गेले काही दिवस सुरु आहे. मात्र हे काम करीत असतांना या कामाच्या संबधित ठेकेदाराने योग्य ती काळजी न घेता मनमानी करून सुरु ठेवलेल्या कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या इंटरनेट केबलचे काम करण्यासाठी रस्त्याच्या साईड पट्टीला खड्डा करण्यात येत आहे. मात्र हा खड्डा खोदत असतांना तीन ते चार फूट खोलवर जोडण्याची गरज असतांना काही ठिकाणी एक फूटही खोदकाम करण्यात आलेले नाही. मात्र खोदलेल्या खड्ड्यात केबल टाकल्यानंतर तो खड्डा बुजवितांना तो योग्य पद्धतीने न बुजविता थातुरमातुर पद्धतीने बुजविल्याने रस्त्याच्या साईडपट्टीची वाताहत झाली आहे. त्यामुळे या साईड पट्टीमुळे पावसाळ्यातही वाहनचालकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर रस्त्यालगत वरच्यावर टाकण्यात आलेली फायबर केबल कालांतराने रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वेळीच वेसण घालत योग्य ती कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
दरम्यान या आधीही रिलायन्स जिओ कंपनीची इंटरनेट केबल टाकण्याचे काम नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरील महामार्गावरील रस्त्याच्या कडेने सुरु होऊन आता सुरु असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे वसाहत शांतीनगर येथे करण्यात आला होता. त्यावेळीही या केबल टाकण्याच्या कामात अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. नागोठणे शहरातील मुख्य रस्त्यावर फॉरेस्ट कार्यालयासमोर खोदकाम केलेल्या कामामुळे त्याठिकाणी रस्ता पुर्वी प्रमाणे न केल्यामुळे याठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झाले होते. असे असताना तसेच यांची कल्पना नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनाला असताना देखील त्यांनी या कामासाठी नाहरकत दाखला का दिला असा प्रश्न सुज्ञ नागोठणेकरांना तसेच सामान्य नागरिकांना पडला आहे.
"संबंधित खात्याच्या नियमानुसारच ग्रामपंचायतीने केवळ हे काम करण्यासाठी नाहरकत दाखला दिला आहे. बाकी हे काम करतांना इंटरनेट कंपनीने ठरवून दिलेल्या तांत्रिक बाबींचे पालन करणे तसेच खोदकाम केलेली जागा पूर्ववत करणे हे त्या संबधित कंपनीचे व ठेकेदाराचे काम आहे. तसेच गटाराच्या जागेतून केबल टाकण्यास मनाई केली असून जर गटारातून केबल टाकलीच असेल तर ती केबल गटारांची साफसफाई करताना तसेच बांधकाम करताना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढून टाकण्यात येईल असे स्पष्ट केले."
डाॅ. मिलिंद धात्रक, सरपंच
ग्रामपंचायत नागोठणे.