Type Here to Get Search Results !

श्री जोगेश्वरी माता चैत्र पालखी सोहळा गालबोट न लागू देता कमी वेळेत उत्साहात साजरा करा - पो. नि. राजन जगताप


श्री जोगेश्वरी माता चैत्र पालखी सोहळा गालबोट न लागू देता कमी वेळेत उत्साहात साजरा करा - पो. नि. राजन जगताप 

रायगड वेध अनिल पवार नागोठणे 

नागोठणे गावची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या चैत्र पालखी सोहळा उत्सव दि. ७ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दि. २२ मार्च रोजी श्री जोगेश्वरी मातेच्या चैत्र पालखी सोहळ्याचे नियोजनबद्ध आयोजन करण्यासंदर्भात श्री जोगेश्वरी माता मंदिर विश्वस्त व उत्सव कमिटी तसेच ग्रामस्थ यांची पालखी मिरवणुकी संदर्भात श्री जोगेश्वरी माता मंदिरात बैठक होऊन त्यामध्ये डिजे साऊंड सिस्टीमचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. घेण्यात आलेला निर्णय हा योग्य व चांगला आहे त्या अनुषंगाने अगोदरच बंदी असलेल्या डीजे सारखे वाद्य न वाजवता पारंपरिक पद्धतीने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पालखी सोहळ्यास गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन श्री जोगेश्वरी मातेचा चैत्र पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करा असे आवाहन नागोठणे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी नागोठणेकर नागरिकांना केले. ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेच्या चैत्र पालखी उत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने दि. ३१ मार्च रोजी सायं. ५
६.३० वा. नागोठणे पोलिस ठाण्यात आयोजित बैठकीत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
यावेळी श्री जोगेश्वरी माता मंदिर विश्वस्त मंडळ सचिव भाई टके, माजी सरपंच विलास चौलकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, विवेक सुभेकर, उत्सव कमिटी अध्यक्ष नितीन राऊत,सचिव मंगेश कामथे, खजिनदार प्रथमेश काळे,उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर, राजा गुरव, जगदीश चौलकर, शंकर भालेकर, मनोज वाघमारे, नारायण तेलंगे, मपारी, प्रणव रावकर, संतोष पाटील, नरेश भंडारी, राजेश पिंपळे, दिनेश कोटकर, केतन भोय, किरण काळे, प्रमोद नागोठणेकर यांच्यासह नागोठणे शहरातील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान श्री जोगेश्वरी मातेचा पालखी उत्सव सोहळा हा पारंपारिक पद्धतीने चांगल्या प्रकारे कसा साजरा होईल यावर यावेळी विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते पालखी मिरवणूक सोहळ्यात पारंपरिक वाद्याचा वापर करणे व कमीत कमी वेळेत एका आळीतून पालखी दुसऱ्या आळीत घेऊन जाणे, एका आळीत पालखी जास्त वेळ थांबली म्हणून दुसऱ्या आळीत त्यापेक्षा जास्त वेळ थांबवणे हे कटाक्षाने टाळावे. डिजे व साऊंड सिस्टीमला पुर्ण बंदी असतानाही कोणी आळीत डिजे वाजवल्यास तो जप्त करण्यात येईल. यासाठी एक लाखापर्यंत दंडांची तरतूद असून डिजे व साऊंड सिस्टीम कायद्यानुसार कायमची जप्त करण्यात येईल. त्यामुळे उत्सव कमिटीने यासंदर्भात सुचना त्या त्या आळीला द्याव्यात. कमीत कमी ४८ तासात पालखी देवळात पोहचेल याची काळजी घ्यावी. यासाठी देवस्थान कमिटी व प्रत्येक आळीतील स्थानिक, दोन स्वयंसेवक यांनी प्रत्येक आळीची दिलेली वेळ पाळणे आवश्यक आहे. यामधे काही अनुचित प्रकार घडल्यास त्या त्या आळीतील पदाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल.प्रत्येक आळीला वेळ ठरवून देत वेळ पाळली नाही तर पोलीसांच्या मदतीने कमिटी सदस्य तसेच स्वयंसेवक यांनी ती पुढे दुसऱ्या आळीत पाठवायची आहे.नागोठणे गावची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी उत्सव सोहळा हा सर्व ग्रामस्थांनी एका आगळ्यावेगळ्या स्वरूपात व आदर्शवतपणे कशा प्रकारे साजरा होईल याकडे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व तरुण वर्गाने आता खऱ्या अर्थाने लक्ष देऊन वाढ वडीलांपासून चालत आलेली धार्मिक परंपरा रीतीरिवाज टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने आनंदाने शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनाचे योग्य ते सहकार्य करावे. ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता पालखीचे पावित्र राखणे हे सर्व ग्रामस्थांचे कर्तव्य असून दिलेल्या सर्व सुचनांचे सर्वांनी काटेकोर पालन करत पालखी सोहळ्यास कोणतेही गालबोट लागू नये याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही शेवटी पोलिस निरीक्षक राजन जगताप यांनी उपस्थितांना केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test