रानडुकराच्या हल्ल्यात वृध्द गंभीर जखमी, वांजळे परिसरात रानडुकराची दहशत
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथे रानडुकरानी केलेल्या हल्ल्यात वृध्द गंभीर झाल्याची घटना सोमवार तारीख २७ रोजी सकाळी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रानडुकरांपासून पिके व जीव वाचवण्याची मागणी वांजळे येथील ग्रामस्थ करत आहेत.
वांजळे येथील रहिवाशी रामदास बाबू लटके सोमवारी सकाळच्या सुमारास आपल्या घराशेजारी असणाऱ्या आंबा बागेत गेले असता अचानक रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ६७ वर्षांच्या वृध्द लटके यांना जबर जखमी केले आहे. बोर्लीपंचतन येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
वांजळे येथील जंगल भागात रानडूकरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गाव परिसरात उपद्रव वाढत चालला आहे. पिकांच्या नुकसानसोबत जीविताला धोका वाढल्याने श्रीवर्धन वनविभागाने वेळीच या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.