वेळास येथील श्री.काळभैरवनाथाच्या होळी उत्सवाचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे-वेळास येथील ग्रामस्थांच्या हाकेला धावणारा नवसाला पावणारा व पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री.काळभैरवनाथाच्या होळी उत्सवाचा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा
तालुक्यातील पंचतन विभागातील सर्वांचा कर्ता-करविता,सर्वांचा वाली,सर्वांचा दाता, रक्षणकर्ता,सर्वांचा तारणहार,सर्वाचे श्रध्दास्थान, नाथांचा नाथ,श्री.काळभैरवनाथ सर्वांच्या रक्षणा ठाम उभा असतो.हुतांशनी पौर्णिमा या शुभ-दिनी महायज्ञ, होम,अर्थात मोठी होळी.त्या अगोदर नऊ पिले आणि दहावा होम,दुसऱ्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा अर्थात धुलीवंदन या दिवशी मंदिरातून श्री.काळभैरव पालखीत बसून होळीकडे प्रस्थांन करतात वाटेत गावातील शिलकर कुटुंबातील मानाच्या घरी पालखी उतरते तिथे मानकऱ्यांच्या घरांतील सदस्यांच्या शुभ-हस्ते पूजा होते.आजू-बाजूच्या शेजारच्या महिला येऊन पूजन करतात त्यानंतर पालखी होळीस्थानी वळते,जातांना रस्त्यांवरील घरच्या महिला औक्षण करतात.
रात्री होमाचे पूजन करून लावलेल्या होमाला पालखीसह भाविक ग्रामस्थ पाच प्रदक्षिणा घालून होळीच्या स्थानावर श्री.काळभैरव आपल्या सहकाऱ्यांसह विराजमान होतात.भाविकांची दर्शनाला ओढ लागते.देवाचा पहारा चालू होतो.दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा.श्री.भैरवनाथ पालखीत बसून गावात फिरतात,घरोघरी पालखी पोहचते.जय-घोष,मनोभावे पूजन, नवस, गाऱ्हाणे, अशा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा असतो. वेळास-आगर आणि मूळ-वेळास या दोन ठिकाणी मंगलमय वातावरणात साजरा होत असतो.श्रध्दास्थांन सर्वांचा एकच,मात्र दोन ठिकाणी दोन स्थानं आणि दोन पालख्या असतात मात्र त्याचं कार्य निर्विघपणे साजरा होत असतो.
मनोरंजन कार्यक्रम सुदीप ऑक्रेस्टा,टांग टिंग टिंगा नाटक,नृत्य स्पर्धा,भजन रजनी,असे विविध कार्यक्रम स्थानिकांनी आयोजित करून या वर्षी जागर केला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित सतकर्मी,कृतिशील महिला पुरुष ग्रामस्थांचा आदर सत्कार केला.असा हा होलिकोउत्सव अर्थात शिमगा चैतन्य, उत्साह, मनोरंजन, भक्तिभावे, भक्तिमय वातावरणात डीजे आणि ढोल-ताशाच्या तालावर रविवार दि.१२ मार्च रोजी सालाबाद प्रमाणे फाल्गुन कृ.पंचमी अर्थात रंगपंचमीच्या शुभ-दिनी होळीस्थाना वरून श्री.काळभैरवच्या दोनही पालख्या त्यांच्या वरील असंख्य गाण्यांच्या ठेक्यावर,चालींवर होळी शेलवून वाजत,गाजत व आनंदात मंदिरात पोहचल्या आणि पालखीचा समारोप झाला तसेच अत्यंत उत्साहात व भक्तिमय आनंदी वातावरणात यंदाचा होळी उत्सव अर्थात शिमगा संपन्न झाला.