माणगांव पोलीसांनी केला सुमारे ४० किलो रक्तचंदन सदृश लाकडांचा साठा जप्त.
माणगाव पोलिसांची पुष्पा फिल्मी स्टाईल कारवाई; ३ आरोपी पकडले.
रायगड वेध गिरीश गोरेगावकर माणगाव
माणगांव पोलिसांनी पुष्पा फिल्मी स्टाईलने कारवाई करत माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातून सुमारे ४० किलो रक्तचंदनसदृश पकडले आहे. लाकडाची तस्करी होणार असल्याची खबर माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना गोपनीय सूत्रांनुसार लागली असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष आस्वर, पोलीस उप निरीक्षक के. ये. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांच्या मार्गदशनाखाली माणगाव पोलीस टीम पोलिस हवालदार रावसाहेब कोळेकर, पोलीस हवालदार दर्शन दोडकुळकर, पो. शि. शामसुंदर शिंदे, पो शि. रामनाथ डोईफोडे, गोविंद तलवारे, अमोल पोंधे, दिपाली मोरे माणगांव वनविभाग वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे व त्यांची टीम यांनी कारवाई केली.
यामध्ये ३ आरोपी सुनील प्रेमचंद पटवा रा. सात रस्ता मुंबई, शरीफ खान वय वर्षे २५ रा. उत्तरप्रदेश, इम्रान शेख सात रस्ता मुंबई हे निजामपूर वरून सुमारे ३८ ते ४० किलो रक्तचंदन सदृश्य लाकडाचा साठा घेऊन वॅगनार कार क्रमांक एम एच ०३ बी सी ३५९८ ही कार घेऊन मुंबई येथून आले होते. त्यांची खबर माणगाव पोलिसांना मिळताच माणगाव पोलीस टीमने सापळा रचून त्यांना माणगाव निजामपूर रोडवरील खर्डी बुद्रुक येथील गारवा हॉटेल जवळ पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तस्करानी तिथून पलायन केले. माणगाव पोलिसांनी शिताफीने रचलेल्या सापळ्यात ह्या तस्कराना माणगाव पोलिसांनी इंदापूर येथे पुष्पा स्टाईलने पाठलाग करून पकडले आहे.
आरोपींकडून मुद्देमाल जप्त केल्यानंतर पुढील तपास माणगाव पोलीस व माणगाव वनविभाग यांच्याकडून संयुक्तिकरित्या सुरू आहे. तपसाअंती आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे यांनी पत्रकारांना दिली आहे.