सोशल मिडीयाचा वापर करताना सावधानतेने रहा, तुमच्या फसवणुकीपासून वाचा- स पो निरीक्षक संदिप पोमाण
दिघी सागरी पोलीस ठाण्याचा उपक्रम, रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
रायगड वेध अभय पाटील बोर्ली पंचतन
सध्याच्या युगामध्ये अँड्रॉइड मोबाईलचा वापर करताना व सोशल मीडियावर सत्यता पडताळून काम करा कारण केव्हाही तुमची फसवणुक होऊ शकते असे आवाहन दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमाण यांनी केले बोर्ली पंचतन गावामध्ये पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर साक्षर गाव अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आताच्या आधुनिक युगामध्ये मोबाईल तसेच सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे किंबहुना प्रत्येक जण याचा वापर करीत आहे, विशेषतः फेसबुक, इंस्टाग्राम वापरत असताना यामध्ये देखील अनेक तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे न्यूड व्हिडीओ कॉल्स द्वारे सेक्सटॉर्शन चे प्रकार वाढले असून यामध्ये काहींनी आपली इज्जत जाईल या भीतीने जीवन देखील संपविले आहे.
याबाबत आशा सायबर गुन्हे घडू नयेत यास्तव सायबर साक्षर गाव अभियान दिघी सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने आज बोर्ली पंचतन मध्ये श्री मोहनलाल सोनी विद्यालय, श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय व डॉ ए आर उंड्रे हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली जनजगृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हे बाबतीत घोषणा दिल्या. बोर्ली पंचतन गावामध्ये तसेच मुख्य बाजारपेठ रस्त्याने एस टी स्टँड पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यातआले होते. उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमाण म्हणाले की, प्रत्येकाने मोबाईल वर जे फेक कॉल्स येतात व यामध्ये विविध प्रकारची आमिषे दाखविली जातात यामध्ये पैशाची लूट आहे हे जाणून अशा कॉल्स ला कोणताही प्रतिसाद देऊ नये, तर आपल्या मोबाईल वर आलेले ओटीपी मॅसेजेस देखील कोणास सांगू नये, सोशल मीडियाचा सावधगिरीने वापर करा ओळखीच्या नसलेल्या फ़्रेंड रिक्वेस्ट ला प्रतिसाद देऊ नका.