म्हसळ्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार "राजकीय सीमोल्लंघन"
◆ स्थानिक पुढाऱ्यांना शिंदे गटाचे आकर्षण
● काही मंडळी घड्याळही सोडण्याच्या तयारीत
◆ पक्षांतर करून नवीन घरोबा करण्याची धडपड सुरू
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली असून राज्यात शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात उभी फूट पडून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट झाल्याने निष्ठावंत शिवसैनिक संभ्रमात पडलेले असून सर्वांसमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
अलीकडच्या काळात देशासह राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे अनेकजण आपला मूळ पक्ष सोडून पक्षांतर करताना दिसत आहेत. सध्या राज्यात सत्तेत असलेले शिंदे - फडणवीस सरकार सर्वांचेच आकर्षण ठरत आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या म्हसळा तालुक्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे स्थानिक पुढारी, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षांतर करून नवीन घरोबा तयार करण्याची धडपड सुरू केली आहे तसेच काही पुढाऱ्यांना सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आकर्षण वाटू लागले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही स्थानिक पुढारी व पदाधिकारी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही पदाधिकारी यांनाही शिंदे गटाची भुरळ पडली असून अनेक वर्षे स्थानिक पातळीवर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते, तसेच ज्यांना वेगवेगळी पदे दिली ते माजी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर ज्यांना गल्ली ते दिल्ली अशी ओळख राष्ट्रवादी पक्षाने दिली आहे ते गाव पुढारी व सामाजिक पुढाऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या तरी कारणांनी "हातातील घड्याळ" सोडून पक्षाला 'जय महाराष्ट्र' करण्याची तयारी केली आहे तर उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारीही शिंदे गटात सामील होण्यासाठी अखेरचा निरोप घेणार असल्याची जोरदार चर्चा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये हॉटेलमधील चाय पे चर्चा, नाक्यानाक्यावरील राजकीय मैत्रीपूर्ण जुगलबंदी चर्चेत रंगत आहे. तालुक्यात जर शिंदे गटांनी विकासकामे करून दाखवली तर अनेक शिवसेनेचे गावे प्रवाहात सामील होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून तालुक्यातील विकास कामे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून होत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात येण्यासाठी शिवसेना पक्षासह अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश, शिवसेना उध्दव ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, उध्दव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश, आणि अन्य पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू असून येणाऱ्या "दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय सीमोल्लंघन होणार" असल्याची चर्चा सुरू आहे.
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शिवसेना, शेकाप पक्षातील स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे- फडणवीस सरकार कडे आकर्षित होत असल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपला मूळ पक्ष सोडण्याच्या तयारीत असून शिंदे गटात सामील होण्याचे मार्गावर आहेत. म्हसळा तालुक्याचा आणि आपल्या गावाचा विकास करण्यासाठी सध्या तरी शिंदे - फडणवीस सरकारच निधी देऊ शकतो आणि सध्या तरी तालुक्यात शिंदे गट पाहिजे तेवढा सक्रिय नाही त्यामुळे आपण आताच शिंदे गटात सामील झालो तर "आपली पाचही बोटे तुपात राहतील" असा तर्क अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी लावला आहे आणि तशी चर्चा नाक्यावर आणि आपल्या विश्वासू कार्यकर्ते यांच्याजवळ दबक्या आवाजात करीत आहेत त्यामुळे म्हसळा तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार असे सध्या तरी दिसत आहे.
विद्यमान शिंदे - फडणवीस सरकारचे भवितव्य कोर्टाचे आणि निवडणूक आयोगाचे निकालावर अवलंबून असले तरी म्हसळ्यात होणारे राजकीय पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा आहे असे तर्क - वितर्क राजकीय गोटातून वर्तविले जात आहेत.
● गट- तटाचे राजकारण आणि पक्षांतर :-
म्हसळ्यात स्थानिक सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगवेगळ्या कारणांनी अंतर्गत गटबाजी व हेवेदावे सुरू असून सत्ताधाऱ्यांची हीच परिस्थिती शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांच्यामध्ये सुद्धा पहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांचे अंतर्गत कलह, गटबाजीपासून शिवसेना पक्ष सुद्धा सुटलेला नाही, शिवसेनेत नाराजीचा सूर असून अनेक पदाधिकारी यांनी राजीनामा देऊन वेगळी वाट धरून अन्य पक्षाचा झेंडा हातात घेण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील काही जेष्ठ व जुन्या जाणत्या पुढाऱ्यांना आपल्या गावातील, पंचक्रोशी भागातील किंवा समाजातील तरुण पिढी, तरुण नेतृत्व राजकीय क्षेत्रात पुढे येऊन वेगळा ठसा उमटवीत असल्याने 'पोटशूळ' उठत आहे आणि यातूनच अंतर्गत गटबाजी किंवा नेत्यांची मर्जी राखण्याच्या हट्टापायी तरुण पिढीला दाबण्याचे काम सुरू आहे. सध्या असलेल्या राजकीय पक्षात तरुणांना योग्य तो मान, सन्मान मिळत नसल्याचे अनेक तरुणांकडून ऐकायला मिळत आहे त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या संख्येने पक्षांतर करून स्थानिक प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सरसावले असल्याचे खात्रीपूर्वक बोलले जात आहे. सध्या असलेल्या पक्षात नवीन व जुने पदाधिकारी हा एक मुद्दा गाजत आहे, त्यातूनही अनेक गट - तट पक्षांमध्ये निर्माण झालेले ऐकायला मिळत आहेत. सध्या गोंधळलेल्या राजकीय अस्थिर परिस्थितीत आगामी काळात राजकीय हित जोपासण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राजकीय पक्षांतर होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.