महिला बचत गटांना रोजगार देऊन आर्थिक सक्षमीकरण करणार - खासदार सुनिल तटकरे
● घोणसे येथे ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी इमारत उद्घाटन व नळपाणी योजनेचे भूमिपूजन संपन्न
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या घोणसे घाटाच्या पायथ्याशी ग्रामपंचायत घोणसे अंतर्गत वसलेल्या सात वाड्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या जळजीवन मिशन योजना अंतर्गत सुमारे 1 कोटी 89 लाख मंजुरी खर्चाचे नळपाणी योजनेचा भूमिपूजन आणि ग्रामपंचायत कार्यालय इमारत - 10 लक्ष, व अंगणवाडी इमारत - 8.50 लक्ष या दोन इमारतींचे उद्घाटन खासदार सुनिल तटकरे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सन 2009 पासून म्हसळा तालुक्यातील गाव वाडी वस्तीवर विविध विकास कामे करीत असताना गावांना जोडणारे पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना या कामांना प्रथम प्राधान्य देऊन अनेक जोडरस्त्यांचे जाळे तयार करता आले असून त्याचबरोबर गावोगावी महिला भगिनींना डोक्यावर हंडा घेऊन पिण्याचे पाणी भरताना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने पाण्याच्या योजना प्रभावी पणे राबविता याव्यात या साठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळजीवन मिशन योजने अंतर्गत नव्याने नळपाणी योजनांना मंजुरी मिळवून घेण्याचे काम केले आहे. एकदा का पाण्याची समस्या संपली आणि पाणी भरताना होणारा त्रास कमी झाला की महिला वर्ग आपोआपच वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळतील त्यामुळे महिला बचत गटांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी बचतगट भवन इमारत बांधून वेगवेगळ्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केले जाईल असे ग्वाही खासदार तटकरे यांनी घोणसे येथे बोलताना दिली. तसेच उद्याचे भवितव्य असणाऱ्या छोट्या छोट्या बालकांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी स्वच्छ व सुबक अशा अंगणवाडी इमारती बांधण्यावर भर दिला. ग्रामपंचायत कार्यालयात आलेली व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन गंभीर चेहऱ्याने कार्यालयात येत असतील पण ते कार्यालयातुन बाहेर पडताना समाधानकारक चेहऱ्याने बाहेर पडले पाहिजे अशी अपेक्षा ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करताना ग्रामपंचायतिचा कारभार पारदर्शक करावा अशी सूचना खासदार तटकरे यांनी दिली. सात वाड्यांमधे वेगवेगळ्या जातींचे लोक राहत असून गावांच्या विकासासाठी एकत्रित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोबत असल्याचे समाधान व्यक्त केले तसेच आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व राहिले पाहिजे अशी विनंती येथील ग्रामस्थांना खासदार सुनिल तटकरे यांनी केली.
ग्रामपंचायतिच्या सरपंच रेशमा कानसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा सांगितला आणि भविष्यात देखील अनेक विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होतील असा विश्वास व्यक्त करून खासदार तटकरे साहेब जी जबाबदारी देतील ती यशस्वी पणे सांभाळण्याची तयारी आहे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर, मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, माजी जिप सभापती बबन मनवे, माजी सभापती छाया म्हात्रे, संदीप चाचले, मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, मुंबई कमिटी सचिव सुनिल महाडिक, तालुका महिला अध्यक्षा सोनल घोले, घोणसे सरपंच तथा जिल्हा चिटणीस रेश्मा कानसे, महिला शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर, युवती अध्यक्षा वृषाली घोसाळकर, मीनाताई टिंगरे, युवक अध्यक्ष फैसल गीते, खामगाव सरपंच प्रियांका निंबरे, उपसरपंच वैदही लाड, राजू लाड, संतोष सावंत, अनिल बसवत, महेश घोले, पक्षाचे पदाधिकारी व घोणसे सात वाड्यांचे अध्यक्ष, पंचक्रोशीतील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते