गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव शांततेत व आनंदाने साजरा करा - सह.पोलीस निरिक्षक संदीप पोमन
रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी
संपूर्ण विश्वाला भयभीत करणारा कोविड संक्रमणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे यंदा सर्व सण, उत्सव धूमधडाक्यात साजरे होतांना दिसून येत आहे. दहीहंडीनंतर झालेला गणेशोत्सव आणि त्यांनतर आता शारदीय नवरात्रौत्सवास सोमवार पासून सुरुवात होणार आहे.त्यामुळे दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहर व परिसरातील गावांमध्ये ज्या शांत पध्दतीने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता गणेशोत्सव आनंदाने उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे आगामी येणारा शारदीय नवरात्रोत्सवही शासनाच्या नियमावली नुसार कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत आनंदाने साजरा करावा अशी सूचना दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सह. पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांनी केल्या. दिघी सागरी पोलिस ठाण्यात गुरुवार दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य तसेच मुस्लिम मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष सदस्य व दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना सह. पोलीस निरीक्षक संदिप पोमन बोलत होते.
यावेळी सभेला महमद मेमन,दिवेआगर सरपंच उदय बापट, दांडगुरी सरपंच गजानन पाटील, शिस्ते सरपंच चंद्रकांत चाळके,दत्तात्रय पांढरकामे,शरद जाधव,सुधाकर शेलार,रमेश घरत,श्रीपाल कवाडे,चंद्रकांत बिराडी,जगन पाटील,मोहन चिरनकर, पोलीस पाटील गायत्री शेलार, उदेश वागजे,दिलीप नाक्ती,दिलीप खेडेकर, व सर्व उपस्थित सर्व नवरात्र उत्सव कमिटीचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सह.पोलीस निरिक्षक संदीप पोमन यांनी सांगितले की, नवरात्र उत्सव साजरा करताना होणाऱ्या गर्दीत महिलांचे दागिने गहाळ अथवा चोरी होणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. महिलांनी कमीत कमी दागिने परिधान करावे जेणेकरून चोरीच्या घटना घडणार नाहीत. बतावणी प्रकार वाढले आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी जागरूक राहून विशेष काळजी घ्यावी. नवरात्र उत्सवात दांडीया गरबा नृत्य कार्यक्रमात महिलांची छेडछाड होणार नाही याची मंडळाने दक्षता घ्यावी. सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करत असताना मंडळाने कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त स्वंयसेवक उपलब्ध करावेत. ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच
विसर्जन मिरवणूकीत उत्सव साजरा करताना जातीय भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. कार्यक्रम ठिकाणी जास्त क्षमतेचे लाईट लाऊ नका जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.सार्वजनिक नवरात्र उत्सव ठिकाणी मंडळाने चांगली आरोग्य विषयक शिबीर , रक्तदान शिबीर आयोजित करण्यात यावेत तसेच सध्या डोके वर काढलेल्या जनावरांसाठी घातक असलेला लंप्मी या आजरांवर मात करण्यासंदर्भात माहिती शिबिर आयोजित करावेत. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने आपल्या स्वंयसेवकांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावेत.कार्यक्रम ठिकाणी स्फोटक पदार्थ ठेऊ नये. बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करा. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सामान्य नागरिकांचीच मदत होते, त्यामुळे आपल गाव, आपली आळी शांत कशी राहील याचा विचार करुन पोलिसांना सहकार्य करत सण उत्साहात साजरा करा असे आवाहन शेवटी पोमन यांनी केले.