वडवली- श्रीवर्धन मध्ये अवैध रेजगा उत्खनन?
बेवारस रेजगा साठा महसूल खात्याकडून उद्धवस्त
तलाठी कार्यालयाच्या जवळच सापडला बेवारस रेजगा साठा
रायगड वेध अभय पाटील बोर्ली पंचतन
श्रीवर्धन तालुक्यामध्ये विशेषतः वडवली गावामध्ये नदीतील गाळ (रेजगा) अवैधरित्या उपसा करून त्याची दिवसाढवळ्या तलाठी कार्यल्यासमोरून वाहतूक करीत असल्याची तक्रार वडवली येथील नागरिकांनी केल्या नंतर वडवली तलाठी कार्यालया जवळच असणाऱ्या भंडारी स्मशानभूमी येथे अवैधरित्या साठा केलेला सुमारे 12 ब्रास रेजगा महसूल खात्याकडून उद्धवस्त करण्यात आला, त्याचप्रमाणे अशीच श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनारी वाळू उपसा करून त्याची देखील वाहतूक होत असल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून यापुढे अवैधरित्या होणाऱ्या अशा वाळू उपसा व वाहतूकिवर कडक कारवाई करण्याची मागणी वडवली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
सध्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये अवैधरित्या गावठी दारूधंदे यांच्यावर कारवाईबाबत महिलांनी दिलेल्या निवेदनानंतर दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून गावठी दारुवधंद्यांवर कारवाईचे सत्र चालू केल्यानंतर आता वडवली येथील ग्रामस्थांनी वडवली मध्ये होत असलेल्या नदिपत्रातून अवैधरित्या होत असलेल्या गाळ (रेजगा) उपसा व वाहतुकी बाबत श्रीवर्धन प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे त्याचप्रमाणे दिवेआगर व तालुक्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यावरून वाळू उपसा व वाहतूक होत असल्याबाबत देखील निवेदन दिले आहे. यावर आज वडवली येथील तलाठी कार्यालया पासून काही अंतरावर असलेल्या भंडारी समाज स्मशानभूमी जवळ नदीपात्रातून अवैधरित्या उपसा करून साठा करण्यात आलेल्या सुमारे 12 ब्रास बेवारस रेजगा महसूल खात्याकडून उद्धवस्त करण्यात आला, ही कारवाई वडवली तलाठी मिलिंद पुठेवाड, मंडळाधिकारी सुनील पाटील यांनी केली. यामुळे या भागात अवैधरित्या रेजगा उपसा कोणाच्या आशिर्वादाने चालू आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे. तर यापुढे तालुक्यातील समुद्रकिनाऱ्या वरून होत असलेल्या अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.