टेंपो ट्रॅव्हलर गाडीतून टायरच्या टुयबमधून वाहतूक; दिघी सागरी पोलिसांची कारवाई
२०० लिटर दारू, टेंपो ट्रॅव्हलरसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
रायगड वेध अभय पाटील बोर्ली पंचतन
टेंम्पो ट्रॅव्हलर गाडीतून टायर ट्यूबमध्ये दारू घेऊन मुरुडहुन बोर्ली पंचतन परिसरामध्ये दारूची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना बोर्ली पंचतन एसटी स्टँड जवळ पकडल्याची घटना घडली. बोर्ली पंचतन परिसरामध्ये मागील काही दिवसामध्ये हातभट्टी दारू व्यवसाय सुरू असल्याच्या विरोधात महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिल्यानंतर दिघी सागरी पोलीसांनी अनधिकृत गावठी दारू धंद्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतल्यानंतर अशा व्यवसायांना आळा बसविण्यात पोलीस यशस्वी झाले असले तरी आता बोर्ली पंचतन, दांडगूरी परिसरामध्ये मुरुडहून गावठी दारू येत असल्याचे या करवाईवरून पुढे आले आहे.
काही दिवसापूर्वी बोर्ली पंचतन, कापोली, शिस्ते, गोंडघर, वडवली, दिवेआगर येथील आगरी समाजाच्या महिलांनी गावठी दारूबंदीच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यावर धडक देत पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतर दिघी सागरी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी याची दखल घेऊन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी छापे टाकून दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले. त्यामुळे बोर्लीपंचतन परिसरामध्ये हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशातच आज मंगळवार, दि. 20 सप्टेंबर रोजी बोर्ली पंचतन एसटी स्टँडजवळ मुरुड येथून एक टँपो ट्रॅव्हलर क्रमांक एमएच 06 एस 8052 मधून टायरच्या ट्यूबमध्ये गावठी दारू घेऊन बोर्ली पंचतन परिसरामध्ये नेत असताना पोलिसांनी पकडले असून या कारवाईत 200 लिटर दारू हस्तगत करण्यात आली आहे. चालकासह एकूण 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सहा. पोलीस निरीक्षक संदिप पोमाण यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.उ.नी. सचिन निमकर, पो.ना. बेल्हेकर, शेडगे, वाहतुक पो. शिपाई शशिकांत भोकारे, महिला पोलीस शिपाई शिंदे यांनी कारवाई केली.