आणखी किती दिवस बसस्थानकाची प्रतीक्षा?
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराला अद्यापही बसस्थानक मिळालं नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या शालेय विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांनी धो - धो पडणाऱ्या पावसात थांबायचे कुठे, असा प्रश्न भेडसावत आहे. मात्र, सातत्याने मागणी होत असताना एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
बोर्लीपंचतन बसस्थानकाला दिघी विभागातील अनेक गावे तसेच दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी - जंजिरा अशी पर्यटन स्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून येणाऱ्या - जाणाऱ्या 64 गाड्यांची नोंद होत असून मुंबई, पुणे शहारांसह गाव खेड्यातील नागरिक प्रवास करत आहेत. मात्र, शहरात असणारे बस स्थानक दहा महिन्यांपूर्वीच अतिक्रमणमध्ये हटवण्यात आलं. परिणामी आता शाळा सुरू झाल्या आणि शेकडो विद्यार्थी व प्रवासी भर पावसात बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहत असल्याने पालक वर्गातून चिंता होत आहे. मागील कित्येक महिन्यापासून होत असलेली बसस्थानकाची मागणी अजुनपर्यंत पूर्ण झाली नसल्याने येथील नागरिक तथा प्रवाशी संताप व्यक्त करीत आहे.
याठिकाणी जिल्हा परिषद, महाविद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्लीपंचतनला शिक्षण घेण्याकरिता आल्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या वाढत्या महत्वानुसार येथे कित्येक वर्षापूर्वीच मोठे बसस्थानक होणे आवश्यक होते. परंतु लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. परिसरातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ग्राहकांचा, विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा संबंध बसस्थानकाशी येतो. मात्र, प्रवाशांना उभे राहण्यासाठी कोणतीच निवारा शेड नाही. सध्या पावसाळी दिवसांमध्ये प्रवासा दरम्यान या सर्वांनी आसरा घ्यायचा कसा, असा प्रश्न पडतो. मागील अनेक महिने त्रास सहन करीत बसची वाट बघावी लागते.
बोर्लीपंचतन एसटी स्थानक हे पर्यटन दृष्ट्या महत्वाचे आहे. दिवेआगर येथील पर्यटनाला भेट दिली असता बोर्ली येथे बसायला शेड नसल्याने हाल होत आहेत. तसं तात्पुरती शेड बांधली गेल्यास प्रवाशांसाठी सोयीचे ठरेल. एसटी प्रशासनाने याचा विचार करावा.
- प्रसाद नकाते, पर्यटक.
बोर्लीपंचतन बस स्थानकाची सुविधा करणे गरजेचे आहे. एसटीतर्फे प्रवाशांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यात विध्यार्थ्यांना गरजेचे एसटी पास दिला जातो. मात्र, येथील कारभार वाऱ्यावर असून त्याकडे साेयीस्करपणे डाेळेझाक केली जाते. येथे निवारा शेडसोबत एसटी अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना प्रचंड शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागताे.
- शालेय विध्यार्थी.
श्रीवर्धन आगार व्यवस्थापनाककडून या समस्येचे निवारण करण्यात यावं. लवकरच तात्पुरत्या का होईना निवारा शेडची सुविधा दिली जावी. त्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांची हाेणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका हाेईल.
- प्रणव हावरे, दिवेआगर.
यांचा विचार व्हावा -
सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाकडून अनेक पावले उचलली जात आहेत. मात्र, ग्रामीण भागातून उलट चित्र पाहायला मिळत आहे. बोर्लीपंचतन येथून येणाऱ्या - जाणाऱ्या 64 गाड्यांची नोंद होत असून जवळपास येथील 600 शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी दिघी, म्हसळा, बोर्ली व श्रीवर्धन असा प्रवास करीत आहेत. तसेच शहराच्या परिसरातील 40 गावांना एसटी सुविधा मिळाव्यात या विचाराने आतातरी एसटी विभागाकडून तात्पुरत्या शेडसह एका कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी. त्यामुळे प्रवाशांच्या समस्या दूर होतील.
अधिकारी सुध्दा नॉट रीचेबल -
अधिक माहितीसाठी पेण विभाग तसेच श्रीवर्धन आगारप्रमुख यांच्याकडे संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे नॉट रीचेबल उत्तर मिळत आहे. त्यामुळे या समस्येकडे महामंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून देखील दुर्लक्ष केलं जात आहे.