वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज - अमित शेडगे प्रांताधिकारी श्रीवर्धन
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
कोकणच्या भूमीत विपुल वनसंपदा आहे.मात्र चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यातील डेरेदार , उंच आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या जुन्या वृक्षांची अतोनात हानी झाली आहे . वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले आहे .
वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत निगडी गौळवाडी येथे वृक्षारोपणाचे आयोजन केले . वनक्षेत्रपाल मिलिंद राऊत वनरक्षक प्रशांत पाटील व तहसीलदार सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार वन खात्याच्या वतीने वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण प्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्या संवादात अमित शेडगे म्हणाले आधुनिक पद्धतीने वृक्षाची लागवड केल्यास निश्चितच फायदा होतो.
श्रीवर्धन परिसरात पर्जन्यमान मोठया प्रमाणात आहे. भौगोलिक परिस्थिती,वातावरण व हवामान या सर्व बाबींचा विचार करून वन महोत्सवामध्ये वन विभागाच्या माध्यमातून चिंच, खैर, पळस,जाभूळ,,काजू , आवळा , कांचन, आपटा विविध प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येत आहे ही बाब निश्चितच पर्यावरण पूरक असून मानवाच्या दृष्टिकोनातून लाभदायक आहे.
मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून वाढतं शहरीकरण धोकादायक ठरत आहे . आरोग्य विषयक बाबींसाठी विपुल प्रमाणात वृक्ष लागवड गरजेची आहे. श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांच्या हस्ते आज आपण तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण केलं . वन महोत्सव निश्चितच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे . वनक्षेत्रपाल मिलिंद राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या तालुक्यात पाच हेक्टर क्षेत्रावर जवळपास साडेपाच हजार वृक्षांची लागवड करण्याचा वन विभागाचा मनोदय आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे . वन महोत्सवा व्यतिरिक्त वन विभागाने अशा स्वरूपाच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करावे महसूल प्रशासनाच्या वतीने वन विभागास पूर्ण सहकार्य केले जाईल असे अमित शेडगे यांनी सांगितले .