म्हसळा तालुका रास्त भाव धान्य व केरोसीन दुकान संघटनेचे विविध मागण्यांसाठी "मूक मोर्चा"
● तहसीलदार समीर घारे यांना दिले लेखी निवेदन
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशन मर्यादित वतीने रायगड जिल्हा रास्त भाव धान्य संघटना संलग्न रास्त भाव धान्य व केरोसीन दुकान संघटना म्हसळा तालुका यांचे मार्फत सोमवार दि.04 जुलै 2002 रोजी संघटनेचे अध्यक्ष श्री.लहू तुरे यांचे नेतृत्वाखाली व सर्व सदस्यांचे सहकार्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालय ते तहसील कार्यालय म्हसळा पर्यत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, यांसह सर्वच पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात सुरू असलेल्या सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानदार यांचे विविध मागण्यांसाठी अनेक ठिकाणी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहेत, याच पार्श्वभूमीवर रास्त भाव धान्य व केरोसीन दुकान संघटना म्हसळा तालुका यांनी मूक मोर्चा काढून म्हसळा तहसीलदार समीर घारे यांना लेखी निवेदन दिले आहे. यावेळी निवेदन सादर करताना तालुका संघटनेचे अध्यक्ष लहू तुरे यांनी दुकानदारांच्या पुढीलप्रमाणे मागण्या असल्याचे सांगितले.
●कोरोना काळामध्ये जे दुकानदार किंवा त्यांचे कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावले आहेत त्यांना शासनामार्फत 05 लाख रुपये सहाय्य मिळावे.
● राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना सर्व दुकानदार विक्रेत्यांना ( वर्ल्ड फूड प्रोग्रॅम) प्रमाणे प्रति क्विंटल 440/- रुपये कमिशन मिळावे.
● गहू, तांदूळ, साखर, डाळ या खाद्य पदार्थांमध्ये प्रती क्विंटल एक किलो घट मिळाली पाहिजे.
● सर्व राज्यातील दुकानांमध्ये खाद्य तेल, डाळ प्रत्येक महिन्याला उपलब्ध करून मिळाली पाहिजे.
● प्रत्येक रास्तभाव दुकानामध्ये (LPG) एलपीजी गॅस विक्रीसाठी शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे.
● गहू, तांदूळ यांची गोणी 51 किलोची पूर्ण असली पाहीजे व गोणी फाटकी नसावी व प्लॅस्टिक गोणी ऐवजी सुती गोणी देण्यात यावी.
● कोरोना काळामध्ये रेशन दुकानदाराने जीवाची पर्वा न करता धान्य वितरित केले आहे त्या दुकानदारांना कोरोना योद्धा म्हणून शासनाने घोषित करावा.
● भारत वर्षचे ग्रामीण भागात जन वितरण प्रणाली (DDP) डीडीपी ची जबाबदारी उपलब्ध गहू आणि तांदूळ खरेदी करून शासनाने दुकानदारामार्फत खरेदी करावी.
● रायगड जिल्ह्यामध्ये नेट चा नेहमी प्रॉब्लेम असतो त्यामुळे 20% ऑफलाईन धान्य वितरित करण्याची परवानगी मिळावी.
अशा विविध मागण्यांसाठी रास्त भाव धान्य व केरोसीन दुकान संघटना म्हसळा तालुका यांचे पदाधिकारी व सदस्य यांनी मुकमोर्चा काढला होता.
यावेळी तालुका संघटनेचे वतीने तहसीलदार समीर घारे यांना लेखी निवेदन देण्यात आले. सदर निवेदन तहसीलदार यांनी स्वीकारून रास्त भाव धान्य दुकानदारांच्या मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांना सविस्तरपणे कळविले जाईल असे आश्वासन तहसीलदार समीर घारे यांनी संघटनेचे पदाधिकारी यांना दिले.