नागोठणे प्रा. आ. केंद्राच्या सुवर्णकाळात करजेकर यांचे मोठे योगदान : डॉ. अभय ससाणे
आरोग्य सहाय्यक यशवंत करजेकर ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
जिल्हा परिषदांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हा राजा असतो तर तेथील सुपरवायझर हे सेनापती असतात. केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी सेनापातीवर असते. हेच टीम वर्क करजेकर यांनी सर्व घटकांना सांभाळून यशस्वी केले. त्याचीच प्रचिती म्हणून त्यांच्या निरोप समारंभाला निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. नागोठणे प्रा. आ. केंद्रात डॉ. पाटील, डॉ. कोकणे, डॉ. वडजे व त्यानंतरच्या काळातही सर्व राष्ट्रीय कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे राबिण्यास सहकार्य केल्याने राज्यात नागोठणे प्रा. आ. केंद्राचा नावलौकिक झाला. त्यामुळेच नागोठणे प्रा. आ. केंद्राच्या सुवर्णकाळात करजेकर यांचे मोठे योगदान असल्याचे कौतुकास्पद उद्गार रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय ससाणे यांनी काढले.
नागोठणे प्रा. आ. केंद्रातील आरोग्य सहाय्यक यशवंत उर्फ भाई करजेकर हे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त निमित्त आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ. अभय ससाणे यांच्यासह नागोठणे प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट, डॉ. हिबा दाफेदार, डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. प्रतिभा ससाणे, केंद्रातील आरोग्य सहाय्यक रमेश हंबीर, आरोग्य पर्यवेक्षक के.के. कनोजे, आरोग्य सेवक वंदन तांबोळी, निवृत्त कर्मचारी बिपीन सोष्टे, सुभाष गरुडे, नारायण म्हात्रे, नमिता म्हात्रे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे एस.एल. बडे, यशवंत वारगुडे, करजेकर यांचे कुटुंबीय सौ. कीर्ती यशवंत करजेकर, मुलगे ॠषीकेश करजेकर, यतीश करजेकर, स्नुषा सौ. संपदा ॠषीकेश करजेकर, महेंद्र पवार, डिंपल जावरे, भाऊ आमडोसकर आदींसह आरोग्य कर्मचारी व करजेकर यांचा मित्रपरिवार यावेळी बहुसंख्येने उपस्थित होता. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून करजेकर यांना निरोगी सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
भाई करजेकर यांना आपल्या मनोगतात भावनांना वाट मोकळी करून देतांना अश्रू आवरता आले नाही. नागोठण्यात २७ वर्षे तर माणगाव-गोरेगाव भागात ११ वर्षे सेवा करीत असतांना सर्वांचे मिळालेले सहकार्य व शिक्षक वडील व आई यांच्यामुळेच मी आहे असे सांगतांनाच आरोग्य खात्याची सेवा मधेच सोडून पत्नीची साथ मिळाल्यानेच दोन्ही मुले आज उच्चशिक्षित झाली व उच्चशिक्षित सून मिळाल्याचे समाधान असल्याचेही यावेळी करजेकर यांनी आवर्जून सांगितले. या निरोप समारंभाचे सूत्रसंचालन वंदन तांबोळी यांनी केले.