दिघी सागरी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
आषाढी एकादशी व बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिघी पोलिस ठाण्यात शुक्रवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
या बैठकीत परिसरातील सरपंच, सदस्य, समाज अध्यक्ष, कमिटी सदस्य तसेच प्रामुख्याने पोलीस पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही उत्सव रविवारी एकाच दिवशी साजरे होत आहेत. त्यामुळे हे उत्सव शांतता व सलोख्यात पार पाडण्यासाठी शांतता बैठकीत परिसरातील विविध मान्यवरांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करत सूचनांचे पालन करुन उत्सव साजरे होतील याची दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. गरज पडल्यास पोलिसांशी संपर्कात राहून पोलिसांची मदत घेणे अशी सूचना उपस्थित नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी केली. सणांमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास पोलीस कारवाई केली जाईल. असा इशारा ही दिला. यावेळी दिघी सागरी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी शहरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.