श्रीवर्धनमध्ये पशू वैद्यकीय फिरता दवाखाना बंद !
दवाखाना बैठा ना फिरता, डॉक्टरविना पशुसंवर्धन सेवेचा उडतोय बोजवारा
पशुधन उपचाराविना, शेतकऱ्यांमध्ये संताप.
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
श्रीवर्धन तालुक्यासाठी गतवर्षी फिरता पशू वैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात आला. या फिरत्या दवाखान्यामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या दारात आजारी पशू रुग्णांवर उपचाराची सुविधा मिळाली. मात्र, सद्या डॉक्टरविना फिरता दवाखाना बंद आहे. शिवाय बोर्लीपंचतन परिसरात मागील तीन वर्षांपासून पशुवैद्यकीय चिकित्सालयात एकही पशुधन विकास अधिकारी नसल्याने पशुधन च आता धोक्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन व पशूसंवर्धन विभागाच्या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री पशूसंवर्धन योजनेतून श्रीवर्धन तालुक्यासाठी फिरता पशू वैद्यकीय दवाखाना फेब्रुवारी २०२१ रोजी सुरु करण्यात आला. फिरत्या दवाखान्याच्या रुग्णवाहिकेची व त्यातील औषधांमुळे खेड्या - पाड्यातील जनावरांना त्वरित उपचार मिळेल या आशेने येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, आज पावसाळी हंगामात श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या संख्येने जनावरे असताना देखील त्यांच्यावर उपचाराची मात्र प्रभावी यंत्रणा नाही. डॉक्टरभावी बंद रुग्णवाहिका शिवाय याठिकाणी असलेले लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात दोन वर्षांपासून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून याचा थेट परिणाम जनावरांच्या उपचारावर होत आहे.
श्रीवर्धन, बागमांडला, दांड्गुरी, बोर्लीपंचतन, दिघी, सायगाव या ठिकाणी पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या विशाल इमारती शासनाने लाखो रुपये खर्चून बांधल्या आहेत. येथे श्रेणीनुसार पशुसंवर्धन सेवा पुरवली जाते. मात्र, यातील श्रीवर्धन वगळता अन्य चिकित्सालयात पर्यवेक्षक व अधिकारी नसल्याने सध्या त्या निरूपयोगी ठरत आहे. घटसर्प, एकटांग्या रोग तसेच लाळ खुरकत, कृत्रिम रेतन, विविध आजार हटविण्यासाठी लसीकरण अशा राबविण्यात येणाऱ्या मोहिमेकडे दुर्लक्ष झाले आहे. आता उरल्या - सुरल्या फिरत्या दवाखान्याची वाट बघत असताना तेही बंद असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे व शेती हिताच्या दृष्टिकोनातून इतर पशु आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये जनावरांवर तात्काळ उपचार मिळावा. परंतु शस्त्रक्रियासारख्या बाबींसाठी शेतकरी आपली जनावरे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशुचिकित्सालयात आणतात. या चिकित्सालयाशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय नाही. परंतु या ठिकाणी अपेक्षित असा उपचार पशुंना मिळत नाही. विविध रिक्त पदे, औषधींचा तुटवडा अशा बाबी याठिकाणी नित्याच्याच झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचा लक्ष नसल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ दिसून येतो.
अतिरिक्त कार्यभार –
श्रीवर्धन तालुक्यात सहा दवाखाने असून या पैकी पाच पशुवैद्यकीय चिकित्सालयात पशुधन विकास अधिकारी नाही. रानवली अधिकारी यांच्याकडे श्रीवर्धन, बागमांडला व पंचायत समिती विस्तार या अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार आहे. तर बोर्लीपंचतन विभागात एकही अधिकारी नाही. अत्यंत बिकट परिस्थितीत जनावरांच्या उपचारासाठी आवश्यक असणारा फिरता दवाखाना बंद आहे.