*निसर्ग चक्री वादळात उध्वस्त झालेल्या शाळांना आम्ही गिरगावकर संस्थेने दिली उभारी*
● रंगरंगोटीने शाळा झाल्या चकाचक
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्री वादळाचा म्हसळा तालुक्याला जोरदार फटका बसला. तालुक्यातील बहुसंख्य शाळा उध्वस्त झाल्या. अजूनही काही शाळा पडझड झालेल्या अवस्थेत असताना "रंग दे माझी शाळा" या उपक्रमांतर्गत गिरगांव मुंबई येथील आम्ही गिरगावकर हि संस्था पुढे आली आणि म्हसळ्यातील काही शाळांची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. म्हसळा शाळा नं.१ आणि रा.जि.प. शाळा नेवरूळ या शाळांना आम्ही गिरगावकर या संस्थेच्या माध्यमातून उभारी मिळाली. या शाळांचा रंगरंगोटीचा संपूर्ण खर्च या संस्थेमार्फत करण्यात आला. यासाठी सारस्वत बँकेचेही सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले. या कामाचा लोकार्पण सोहळा प्रांत अधिकारी अमित शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
यावेळी तहसीलदार समीर घारे,आम्ही गिरगावकर टीमचे अध्यक्ष गौरव सागवेकर, सचिव मिलिंद वेदपाठक, महिला सचिव शिल्पा नायक, सदस्य नागेश पोतदार, दिपक राजपूरकर, माजी उपसभापती रविंद्र लाड, नेवरूळ गाव अध्यक्ष राजेंद्र लटके, पोलीस पाटील निलेश लटके, माजी अध्यक्ष दत्तात्रय लटके, सुनिल अंजर्लेकर,संतोष उद्धरकर, अभिजित वळंगरे, संतोष सुर्वे, अजय करंबे,मांदाटणे सरपंच चंद्रकांत पवार, किशोर मोहिते,एम.एस.जाधव, नेवरूळ मुख्याध्यापिका संगीता निरणे, शिक्षिका खेडेकर, कल्पना पाटील सर्व शिक्षिका, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपलें विचार प्रगल्भ ठेवणे अत्यावश्यक असून आय.पी.एस. सारखे अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा मनाशी बाळगली पाहिजे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरनेने आम्ही या संस्थेचे काम करीत असून येत्या तीन महिन्यात आणखीन २०० शाळांची रंगरंगोटी, डागडुजी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष सागवेकर यांनी सांगितले.
एक विद्यार्थी चार किलोमीटर एसटी प्रवास करून पुढील दिड किलोमीटर प्रवास हा चालत करीत आहे हा त्याचा रोजचा दिनक्रम आहे, असे माजी सभापती रवींद्र लाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. त्याचवेळी लाड यांचे बोलणे ऐकून आम्ही गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी लगेच या विद्यार्थ्यांला सायकल देण्याचे आश्वासन दिले.
उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी आम्ही गिरगावकर संस्थेचे विधायक कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून म्हसळा शिवसेना युवाधिकारी कौस्तुभ करडे यांनी विद्यार्थ्यांना शूर वीरांच्या गोष्टिंच्या पुस्तकांचे वाटप केले. तसेच या टिमच्या वतीने नेवरुळ शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.