उरण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीमुळे जनता हैराण.
• नियोजनाचा उडाला बोजवारा.
• वाहतूक कोंडी दूर करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
उरण शहरात अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या आ वासून उभी आहे. या वाहतूक कोंडीवर उपाययोजनाच होत नसल्याने दररोज उरण शहरात महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी उरणमधील जनतेने केली आहे.
सध्या सर्वत्र शाळा महाविद्यालये सुरु झाले आहेत.या शाळेतील विद्यार्थी व या विदयार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी व शाळा सूटल्यानंतर घरी नेण्यासाठी पालक वर्गही येतात. विद्यार्थी व पालकांचे टू व्हीलर , फोर व्हीलर वाहने उरण शहरात मुख्य रस्त्यावरच वेडी वाकडी कशीही लावलेली आढळून येत आहेत.शिवाय ग्रामीण भागातून बाजारासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.प्रत्येकजण शहरात टू व्हीलर, फोर व्हीलर घेऊन शहरात येत आहेत. अशा वाहनांचीही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.उरण शहरात पार्किंगची पाहिजे तशी योग्य सुविधा,जागा नसल्याने याचे दुष्परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. जिथे 5 मिनिटात पोहोचायला पाहिजे तिथे 15 ते 20 मिनिटे जास्त लागत आहेत . पार्किंगसाठी योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय अनेक दुकाने, टपरी यांचे सामान रस्त्यावर येत आहे. दुकानदार आपल सामान रस्त्यावर विकण्यासाठी ठेवत असल्याने रस्ता त्या सामानाने भरून जातो. शिवाय उरण शहरातील सर्वच रस्त्यावर भाजीपाला फळविक्रेते, विविध वस्तू विक्रेते हातगाडीवाले यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने उरण मधील नागरिकांना मोकळा श्वास होणे कठीण जात आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही.त्यामूळेही वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे.उरण शहरातील रस्त्यावरील वाहनांच्या नियोजनासाठी सम विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण वाहन चालक या नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. अवैध बेकायदेशीर वाहने पार्किंग करणाऱ्यांवर तसेच रस्त्यावर वेडी वाकडी वाहने लावणाऱ्यांवर उरण नगर परिषद किंवा पोलीस प्रशासनाच्या वाहतूक विभागा तर्फे कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याने अवैध वा बेकायदेशीर पार्किंगला व वाहतूक कोंडीला प्रोत्साहन मिळत आहे.प्रशासनाने या सर्व समस्या लक्षात घेऊन उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी अशी मागणी उरण शहरातील जनतेने केली आहे.उरण मधील नागरिकांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बेलापूर,उरण नगर परिषद, वाहतूक विभाग उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार करून देखील समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
उरण शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे - आनंदनगर, पालवी हॉस्पिटल जवळ, राजपाल नाका, कोटनाका, गणपती चौक, स्वामी विवेकानंद चौक, पेन्शनर्स पार्क,वाणीआळी, तहसील कार्यालय जवळ, बाझारपेठ