आंबवणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभाताई भगवान हिरवे यांची बिनविरोध निवड
रायगड वेध समाधान दिसले खालापूर
मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या आंबवणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभाताई भगवान हिरवे यांची 15 जून रोजी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून प्रत्येक सदस्याला उपसरपंचपद मिळावे ही संकल्पना राबविल्याने प्रत्येकाला याचा लाभ मिळाल्याने सर्व स्तरातून आंबवणे ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.
याप्रसंगी सरपंच मच्छिंद्र कराळे, तात्कालीन उपसरपंच संगिता नेवासकर, सदस्य गोरक्ष मेहता, सदस्य गणेश मानकर, सदस्य चिमाजी तिडके, सदस्या अंकिता खोंडगे, सदस्या सुलाबाई फाटक आदीसह मोठ्या संख्येने सर्व पक्षीय नेते, विविध लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला वर्ग व तरुण वर्ग उपस्थित होता.
मुळशी तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी आंबवणे ग्रामपंचायत ही प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीच्या कारभार थेट सरपंच मच्छिंद्र कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना काही सदस्यांना उपसरपंचपद मिळावे, यासाठी ठराविक वर्षाकरिता सदस्याला उपसरपंच बनविले जात असून उपसरपंच संगिता नेवासकर यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होत या रिक्त पदासाठी 15 जून रोजी आंबवणे ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक घेण्यात आली. यावेळी शोभाताई भगवान हिरवे यांचा अर्ज आल्याने त्यांना निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच संगिता नेवासकर व ग्रामसेवक हनुमंत बंडलकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. तर उपसरपंच पदी शोभाताई हिरवे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामपंचायतीने सदस्याला उपसरपंच पद मिळावे असा उपक्रम राबविल्याने ग्रामपंचायतीचेही कौतुक होत असून उपसरपंच शोभाताई हिरवे याचे अभिनंदन करित पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.