Type Here to Get Search Results !

म्हसळा शहरात गटारे तुंबली, आरोप प्रत्यारोपाणे सत्ताधारी आणि विरोधकांमधे जुंपली..!


म्हसळा शहरात गटारे तुंबली, आरोप प्रत्यारोपाणे सत्ताधारी आणि विरोधकांमधे जुंपली..!

● दुर्गंधीने नागरिक हैराण

● रोगराई पसरण्याची भीती

● म्हसळा नगरपंचायतीचा स्वच्छता कारभार रामभरोसे ?

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

    स्वच्छतेच्या नावावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या म्हसळा नगरपंचायतिच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. शहरात अनेक ठिकाणी गटारे उघडी आहेत तर या गटारातून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने कित्येक महिने गटारे तुडूंब भरून राहिलेली असून गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर तुंबलेली गटारे साफ करण्यासाठी नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाला पुरेसा वेळच मिळत नाही की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्या नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे असून स्वच्छता मोहिमेची ऐशी की तैशी करून टाकल्याची वस्तुस्थिती शहरात पहावयास मिळत आहे. तर अस्वच्छता व दुर्गंधी वातावरणामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमधून वर्तविली जात आहे.
     मागील 6 वर्षांपूर्वी म्हसळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मधे रूपांतर झाले असून 17 वार्ड असलेल्या नगरपंचायतीत दोन्ही वेळेस झालेल्या निवडणुकीत शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने आणि खात्रीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात एकहाती सत्ता दिली. कारण येथील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील या उद्देशाने एकहाती सत्ता दिली परंतु बऱ्याच प्रश्नांच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांकडून येथील जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे. नगरपंचायतिच्या माध्यमातून अद्याप पर्यंत जनतेच्या हिताचे कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. मागील पाच वर्षांपूर्वी नगरसेवक पदावर असलेल्या काही अनुभवी नगरसेवकांना दुसऱ्यांदा या टर्मला ही जनतेने संधी दिली आहे तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी नगरसेवकांना खुश ठेवण्यासाठी विविध समित्यांवर बढती देण्यात आली आहे. एकहाती सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांना जनतेच्या आरोग्याचे व येथील स्वच्छतेचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे व अतिशय ढिसाळ कारभार सुरू आहे. तुंबलेल्या गटारांमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत तर काही ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
   एकीकडे म्हसळा नगरपंचायत हद्दीतील शहरात गटारे सांडपाणी व कचऱ्याने तुंबलेली असताना सत्ताधारी नगरसेवक व विरोधी पक्षाचे नगरसेवक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करून कलगीतुरा रंगत असल्याची चर्चा असून म्हसळा शहरात गटारे तुंबली आणि सत्ताधारी व विरोधकांमधे जुंपली अशी काहीशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.
-----
  काही वार्डात केलेली साफसफाई फक्त वरचेवर केलेली असून सत्ताधारी नगरसेवकांनी फोटो सेशन साठी दिखावा केलेला असून कचऱ्याचे सफाई मधून सफाईदारपणे कमिशन खाण्याचे काम सुरू आहे, नगरसेवक पासून ते सत्ताधारी वरीष्ठ नेतेमंडळीचा कमिशनवर डोळा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुफीयान हळदे यांनी केला असून हे कमिशन कोण - कोण घेत आहेत ? हे येणाऱ्या काळात चौकशी करून जनतेसमोर आणले जाईल असे नगरसेवक सुफीयान हळदे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांचे माध्यमातून म्हसळा शहरात करोडो रुपयांची विकास कामे होत आहेत हे विरोधकांना पाहवत नाही, विकास कामांचे पोटशूळ विरोधकांना उठले आहे, त्यामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक आमच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा म्हसळा नगरपंचायत स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती संजय यशवंत दिवेकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना केला आहे.
--------//
     काही महिन्यांपूर्वी स्वच्छतेचे संदेश देणारे सुविचार व स्लोगन शहरातील सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर आणि इतर ठिकाणी लिहलेली आहेत परंतु याचा काहीसा फायदा झालेला दिसत नाही. शहरातील कुंभारवाडा, तांबटआली, सानेआली, दिघी रोड नाका, गवळवाडी परिसर, विठ्ठल रखुमाई मंदिर ते कुंभारवाडा रस्ता, एसटी स्टँड ते पंचायत समिती, मच्छी मार्केट, नगरपंचायत इमारत ते दिघीरोड नाका, पंचायत समिती, तहसील कार्यालय परिसर, पोलीस स्टेशन ते पाभरा फाटा, दिघी रोड मिनिडोअर व रिक्षा स्टँड, डॉक्टर राऊत दवाखाना यांचे समोरील परिसर, सर्व मोहल्ले, स्टेट बँक ऑफ इंडिया परिसर, एसटी स्टँड, ग्रामीण रुग्णालय, एचपी पेट्रोल पंप समोर, साने आळी, जुना पोस्ट ऑफिस, सनाबिल अपार्टमेंटच्या बाजूला, बौद्धवाडी अशा विविध परिसरातील गटारे उघडी असून कचरा व घाण सांडपाण्याने भरलेली आहेत.
   गटाराच्या पाण्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, छोट्या मोठ्या गाड्यांचे टायर, वाया गेलेला भाजीपाला, हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेला अन्न पदार्थ, त्याचबरोबर विविध टाकाऊ वस्तू टाकल्याने गटारे भरलेली आहेत. एकीकडे मात्र दर महिन्याला स्वच्छतेच्या नावाखाली नगरपंचायत लाखो रुपये खर्च करीत आहे, तरीही स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असून उघडी गटारे आणि त्यात तुडूंब साचलेले सांडपाणी पाहून नगरपंचायत लाखो रुपये खर्च करते कुठे ? हा प्रश्न म्हसळा शहरातील नागरिक विचारीत आहेत. तर आता काही दिवसांनी पावसाळा सुरुवात होईल त्या अगोदरच गटारे साफ करणे गरजेचे आहे असे मत काही जाणकार व्यक्त करीत आहेत.


------------------------------
●● नागरिक व नगरपंचायत मधे स्वच्छतेबाबत समन्वय नाही...

     नगरपंचायत मार्फत कचरा गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व कचरा गोळा करणारी गाडी घेऊन कर्मचारी शहरात फिरत असतात परंतु काही नागरिक मोठ्या प्रमाणात घरातील कचरा उघड्यावर टाकत असल्याने त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही तर हा कचरा गुरे, कुत्री खाऊन त्याची सर्वत्र नासधूस करतात आणि बऱ्याच वेळा हा कचरा उघड्या गटारात जाऊन साचून राहतो त्यामुळे गटारे सांडपाण्याने भरलेली आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरातील नागरिक व नगरपंचायत मधे समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. 
-----------------------


" म्हसळा शहरातील गटारे साफसफाई करण्याचे काम सुरू आहे, काही भागात साफ करायची राहिलेली गटारे लवकरच साफ करून होतील. ज्या ठिकाणी कचरा साफ केला जातो त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा नागरिक कचरा आणून टाकत आहेत, शहरातील नागरिकांनी देखील स्वच्छतेच्या बाबतीत पुढाकार घेऊन नगरपंचायतीला सहकार्य करणे गरजेचे आहे. 
श्री.सुनिल शेडगे
उपनगराध्यक्ष - नगरपंचायत म्हसळा

◆ सत्ताधारी नगरसेवकांचा फोटो सेशन साठी दिखावा :-

म्हसळा नगरपंचायत शहरातील गटारे व नाळे साफसफाई करण्यात अपयशी ठरत आहे. अनेक वार्डात छोटी-मोठी गटारे सांडपाणी, कचरा व वेगवेगळ्या घाणीने तुडुंब भरलेली आहेत, काही वार्डात केलेली साफसफाई फक्त वरचेवर केलेली असून सत्ताधारी नगरसेवकांनी फोटो सेशन साठी दिखावा केलेला आहे. कचऱ्याचे सफाई मधून कमिशन खाण्याचे काम सुरू आहे, नगरसेवक पासून ते सत्ताधारी वरीष्ठ नेतेमंडळीचा कमिशनवर डोळा असून हे कमिशन कोण - कोण घेत आहेत ? हे येणाऱ्या काळात चौकशी करून जनतेसमोर आणले जाईल. 
श्री.सुफीयान हळदे
नगरसेवक - म्हसळा नगरपंचायत (काँग्रेस पक्ष)

★ "म्हसळा नगरपंचायत हद्दीत बऱ्याच ठिकाणी गटारे घाणीने भरलेले आहेत. सत्ताधारी सांगतात की आमच्याकडे स्वच्छता करणारे माणसे कमी आहेत तर त्यांनी माणसे वाढवावीत. भरलेल्या गटारातून घाण वास येत असतो, नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी गटारे साफ झाली पाहिजेत."
सौ.राखी करंबे
नगरसेविका - म्हसळा नगरपंचायत (शिवसेना पक्ष)

■ "म्हसळा शहरात गटारे भरलेले आहेत अशा काही तोंडी तक्रारी होत आहेत, आम्ही पहिल्या फेरीत शहरातील गटारे साफसफाई केली होती आता नव्याने पुन्हा साफसफाई सुरू आहे, जिथे गटारे भरली असतील ती त्वरित साफ करून घेतली जातील."
श्री.मनोज उकिर्डे
मुख्याधिकारी - नगरपंचायत म्हसळा

◆ प्रतिक्रिया :-

★ "म्हसळा नगरपंचायतीचा स्वच्छता विभाग चांगले काम करीत आहे, अनेक ठिकाणी गटारे साफसफाई करून झालेले आहेत, काही ठिकाणी गटारे साफ करायची राहिली आहेत तेथील गटारे साफ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, पाऊस पडण्यापूर्वी सगळी गटारे साफ करून होतील. काँग्रेसचे नगरसेवक डॉ.मुविझ शेख यांनी स्वखर्चाने 6 बोअरवेल खोदल्या त्यातील एक ग्लास भर तरी पाणी शहरातील जनतेला पियाला मिळाले आहे का ? याचे उत्तर द्यावे ?, नगरपंचायत मध्ये जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांनी फक्त स्वच्छता करणारे ठेकेदार बदलले पाहिजे हाच मुद्दा घेऊन बसले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांचे माध्यमातून म्हसळा शहरात करोडो रुपयांची विकास कामे होत आहेत हे विरोधकांना पाहवत नाही, विकास कामांचे पोटशूळ विरोधकांना उठले आहे, त्यामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक आमच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत."
श्री.संजय यशवंत दिवेकर
सभापती - स्वच्छता व आरोग्य समिती 
नगरपंचायत म्हसळा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test