Type Here to Get Search Results !

नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीच्या जागेत वैयक्तिक स्वरुपाच्या बांधकामांच्या परवानगीने संताप


• नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीच्या जागेत वैयक्तिक स्वरुपाच्या बांधकामांच्या परवानगीने संताप  

• मुदत संपलेल्या संचालक मंडळाच्या निर्णयाने सभासदांमध्ये नाराजी

• भव्य व्यापारी संकुल व दुकान गाळ्यांचा प्रकल्प हवेत विरला  


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीच्या जागेत सध्या वैयक्तिक स्वरुपाची बांधकामे करण्याची परवानगी देण्यात आली आली आहे. अशाचप्रकारे एका बांधकामासाठी संबधितांनी वाळू व विटा संस्थेच्या जागेत टाकल्या आहेत. त्यामुळे ज्या व्यापारी संकुलाच्या कारणासाठी संस्थेची जुनी इमारत तोडण्यात आली त्या ठिकाणी जर वैयक्तिक बांधकामे सुरु झाली तर नियोजित व्यापारी संकुलाच्या बांधकामाचे काय ? असा प्रश्न सभासद वर्गातून विचारला जात असून एक वर्षापूर्वीच मुदत संपलेल्या संचालक मंडळाच्या या निर्णयाने सभासदांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.   

नागोठणे विभागात सर्वात मोठी असलेल्या या संस्थेची स्थापना १८ सप्टेंबर, १९६९ साली झाली आहे. रोहा व पेण तालुक्यात समाविष्ट असलेल्या गावांतील १ हजार सभासदांचा यामध्ये समावेश आहे. याच संस्थेची जुनी जीर्ण झालेली भातगिरणी व सुमारे १५ ते २० भाडेकरू राहत असलेल्या इमारती काही वर्षांपूर्वी व्यापारी संकुल बांधण्याच्या उद्देशाने तोडण्यात येऊन सर्व जागा मोकळी करण्यात आली. याच मोकळ्या जागेच्या एका बाजूला भातगिरणीसाठी इमारत बांधण्यात येऊन सभासदांसाठी भात भरडणी सुरु करण्यात आली. इतर मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचे संस्थेच्या वार्षिक सभेत ठरविण्यात आले होते. हे काम ४५ : ५५ या वाटप तत्वाने बिल्डरला देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र संस्थेची जागा कुणा बिल्डरच्या घशात न घालण्याचे सभासदांच्याच एका विशेष सभेत ठरविण्यात आल्याने व्यापारी संकुलाचा विषय स्थगित झाला होता.

याच दरम्यानच्या काळात संस्थेच्या जागेत इच्छुक सभासदांकडून ठराविक रक्कम आगाऊ स्वरूपात डीपॉझीट स्वरूपात घेऊन दुकान गाळे बांधण्याची योजना विद्यमान संचालक मंडळाकडून तयार करण्यात आली होती. मात्र अवास्तव डीपॉझीट व भाड्याच्या रकमेच्या मागणीमुळे या योजनेलाही सभासदांनी पाठ फिरविली होती. तेव्हापासून ही जागा मोकळीच ठेवण्यात आली आहे.  

तर येथील सरकारी दवाखान्यासमोर असलेले संस्थेचे दुकान गाळे मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात बाधित झाल्यानंतर खासदार सुनील तटकरेंच्या सहकार्यामुळे दुकान गाळ्यांचा मोबदला म्हणून संस्थेकडे ३२ ते ३५ लाख रुपये जमा झाले होते. एवढी मोठी रक्कम संस्थेकडे जमा झालेली असतांना संस्थेची जागा कुणा बिल्डरला देऊन भव्य व्यापारी संकुलाच्या मागे न लागता त्याच रकमेमध्ये संस्थेच्या मोकळ्या जागेत खाली दुकान गाळे व वरील बाजूस भाडेकरूंसाठी खोल्या अशा पद्धतीने बांधकाम करता येणे शक्य होते. मात्र तसे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. शिवाय संस्थेकडे आलेल्या त्या मोठ्या रकमेचे काय झाले ? या रकमेपैकी आता किती रक्कम शिल्लक आहे याचीही चर्चा सभासदांमधून होत आहे.अशातच संस्थेने स्वता बांधकाम न करता अशाप्रकारे वैयक्तिक बांधकाम करण्यास परवानगी मुदत संपलेल्या संचालक मंडळाने दिलीच कशी ? तसेच यानंतर कोणी सभासद अशाप्रकारे बांधकामाची परवानगी मागण्यास आले तर संस्था किती जणांना जागा देईल असे अनेक प्रश्न सभासदांकडून उपस्थित होत आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या संचालक मंडळाने आपली मनमानी थांबविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान यासंदर्भात संस्थेचे सभापती प्रभाकर ठाकूर यांनी फोन उचलण्याचे टाळल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. तर संस्थेचे सचिव अनंत पाटेकर यांनी ही बांधकाम परवानगी संचालक मंडळाने मासिक मिटिंगमध्ये ठराव घेऊन संस्थेच्या एका सभासदला तीन हजारांच्या मासिक भाड्याने दिली असल्याचे स्पष्ट केले. 

 
 मुदत संपलेल्या नागोठणे भातगिरणीची निवडणूक पुढील टप्प्यात होणार असून आधीच्या या संचालक मंडळाला फक्त दैनदिन कामकाज चालविण्यासाठी अधिकार असून मुदत संपल्यानंतर इतर कोणतेही निर्णय घेण्याची अनुमती त्यांना नाही.सध्यातरी इतर कोणतेही महत्वाचे निर्णय हे पुणे येथील पणन संचालक यांच्या मान्यतेनेच घ्याचे असल्याने सहकारी भातगिरणीच्या जागेत वैयक्तिक स्वरुपाच्या बांधकामांच्या संदर्भात संबधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
 *तुषार लाटणे - सहाय्यक निबंधक रोहा*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test