घोणसे ग्रामपंचायतीच्या सरपंच रेशमा कानसे यांची रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यातील घोणसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.रेशमा रमेश कानसे यांची रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाली असून त्यांना नियुक्तीचे पत्र खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उमा संदिप मुंडे तसेच जिल्ह्यातील महिला पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
रेशमा कानसे या राजकीय क्षेत्रात अनुभवी असून त्यांनी या पूर्वी 10 वर्ष म्हसळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत घोणसे सरपंच म्हणून चांगले काम केले असून त्यांचे कार्यकर्त्यांशी चांगले संबंध असल्यामुळे आणि पक्ष वाढविण्याच्या दृष्ठिने उत्तम काम केल्यामुळे वरिष्ठानी त्यांची रायगड जिल्हा कमिटी वर सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याचे बोलले जाते. माझ्या सारख्या एका खेड्यातील सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकून एवढी मोठी जबाबदारी दिल्याने ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन असे नवनिर्वाचित रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस रेशमा कानसे यांनी सांगितले आहे.