• श्रीवर्धन वाचनालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन
• ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे. - ॲड. अतुल चौगुले
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
दिघी - आताचे युग स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या स्वरूपात ऊर्जा साठवलेली असते फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ॲड. अतुल चौगुले यांनी केले आहे.
सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन येथे सामाजिक कार्यकर्ते शिवराज चाफेकर ग्रुपच्या वतीने दहावी व बारावी इयत्तेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सदर प्रसंगी अध्यक्ष भाषणात अतुल चौगुले म्हणाले गुणवंत विद्यार्थ्यांनी संपादित केलेले यश कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार पुढील क्षेत्र निवडावे आपल्यामधील सुप्त गुणांचा विचार करून आपल्या क्षमता आपली स्वप्न यांची सांगड घालत भविष्याचे नियोजन करावे. व्यक्तीला आवड असणाऱ्या क्षेत्रात शिक्षण घेतल्यास निश्चितच यशाचे शिखर सहजासहजी काढता येते. घरातील जेष्ठ व्यक्ती शिक्षक वर्ग यांच्याशी योग्य विचार विनिमय करून तुम्ही सर्वांनी योग्य क्षेत्र निवडावे. तुम्ही संपादित केलेल्या यशाने निश्चितच श्रीवर्धनकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. असे ॲड. अतुल चौगुले यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश करडे, पालक प्रतिनिधी संदीप आव्हाड, नगरसेवक अनंत गुरव, विद्यार्थी प्रतिनिधी यश नांदविडकर, आयोजक शिवराज चाफेकर यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संतोष सापते यांनी केले. सदरच्या गुणवंत विद्यार्थी कार्यक्रमाच्या आयोजनात काशिनाथ गुरव, शिवराज चाफेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. र. ना. राऊत महाविद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या 10 आणि बारावीच्या कला आणि वाणिज्य शाखेच्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.