तळा शहरातील हायमास्ट दिवे लवकरच होणार सुरू, तळा शहराच्या सौंदर्यात पडणार भर.
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
तळा शहरात बसविण्यात आलेले हायमास्ट दिवे व पथदिवे लवकरच सुरू होणार असून यामुळे तळा शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.एमएसआरडीसी कडून तळा शहरातील रस्त्यांवर दोन हायमास्ट दिवे व चौदा पथदिवे बसविण्यात आले आहेत.त्यापैकी एक हायमास्ट दिवा तळा इंदापूर रस्त्यावर असलेल्या कब्रस्थानाजवळ व दुसरा मांदाड रस्त्यावर चंडिका देवी चौकात बसविण्यात आला आहे.तसेच पाच पथदिवे स्वामी समर्थ नगर पर्यंत व नऊ पथदिवे हे काळबेरे पोल्ट्री फार्म पर्यंत बसविण्यात आले आहेत.मात्र हे हायमास्ट दिवे पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही बंद अवस्थेत होते.यामुळे हे हायमास्ट दिवे पेटणार तरी कधी असा प्रश्न तळावासीयांकडून विचारला जात होता.याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.त्यामुळे भाजप प्रदेश सचिव रवि मुंढे यांनी हायमास्ट दिवे तसेच शहरातील प्रलंबित पाण्याच्या योजनेबाबत १० जून रोजी उपोषणाला बसणार असल्याचा ईशारा दिला होता.याची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने दोन दिवसांत शहरातील हायमास्ट दिवे व पथदिवे सुरू करण्यात येतील तसेच पाणी योजनेबाबत येत्या १६ जून रोजी मिटिंग घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देऊन उपोषण न करण्याची विनंती रवि मुंढे यांना केली.त्यामुळे येत्या दोन दिवसात शहरातील हायमास्ट दिवे व पथदिवे सुरू होणार असून एकंदरीत शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल तळावासीयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.