• नागोठणे पोलिसांकडून कालकाई जंगलातील दोन गावठी दारु हातभट्ट्या उध्वस्त
• ४७ हजार रूपयांचे गुळमिश्रित रसायन केले नष्ट
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील कालकाई जंगल परिसरातील अवैधरित्या सुरु असणार्या गावठी दारुच्या हातभट्ट्या विरोधात पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोहिम राबविताना नागोठणे पोलीस ठाण्यातील पथकाने बुधवार दि. १५ रोजी कालकाई जंगल परिसरात धाड टाकत येथील गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या.
या प्रकरणी नागोठणे पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागोठणे पोलीस पथकाने या धाडीत एका ठिकाणी प्लास्टिकचे ५० लि. क्षमतेचे चार ड्रम व ३० लि. क्षमतेचा एक ड्रम आढळून आले. यामध्ये ४० रुपये दराने विक्री होणारे ९२०० रुपये किंमतीचे साधारण २३० लिटर गुळमिश्रित असलेले रसायन मिळून आले.तसेच प्लास्टिकचे १०० लि. चे एक व २० लि. चे तीन असे एकूण चार ड्रम मध्ये सुमारे ६४०० रुपयांचे १६० लि. गुळमिश्रित रसायन मिळून आले. याचबरोबर लोखंडी पत्र्याच्या ०४ टाक्या मिळून आल्या त्यात साधारणता ८०० लि. गुळमिश्रित रसायन मिळून आले असून त्याची किंमत ३२००० रुपये आहे. असे एकूण ४७६०० रुपये किंमतीचे ११९० लि. गुळमिश्रित रसायन मुद्देमाल यावेळी पो. ना. गायकवाड, पो. ना. परेश मोरे,पो.शि.रामनाथ ठाकूर, पो.शि. सत्यवान पिंगळे, पो. शि. पाटील या पोलीस पथकाने हस्तगत केले.सदरचा मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला असल्याचे नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी सांगितले.
दरम्यान नागोठणे पोलीसांनी अवैधरित्या जंगल परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त करण्यासाठी सुरु केलेल्या गावठी दारु विरोधी या मोहिमेचे संपूर्ण नागोठणे विभागातील जनतेकडून स्वागत करण्यात येत असले तरी हे अवैधरित्या जंगल परिसरात गावठी हातभट्टी चालविणारे गावठी दारु बनविणारे माफिया मात्र पोलीसांच्या हाती लागत नसल्याने या परिसरात चिंता व्यक्त होत असतानाच याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.