Type Here to Get Search Results !

म्हसळा एसटी स्थानकावर "खाजगी वाहतूकदारांचे साम्राज्य"..!


म्हसळा एसटी स्थानकावर "खाजगी वाहतूकदारांचे साम्राज्य"..!

● एसटी स्थानक परिसराला खाजगी वाहनांचा विळखा

● स्थानक परिसरात होतंय वाहतूक कोंडी

● परिवहन विभागासह पोलीस यंत्रणेचे खाजगी वाहतुकीकडे दुर्लक्ष


 रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


 राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीवर्धन आगाराचे म्हसळा एसटी स्थानक हे मध्यवर्ती व महत्त्वाचे प्रवासी वाहतुकीचे ठिकाण आहे. मात्र सद्यस्थितीत सदरच्या म्हसळा एसटी स्थानकावर खाजगी वाहतुकदारांनी साम्राज्य तयार केले असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून खाजगी वाहतूकदारांनी एसटी स्थानकाला जणू विळखाच घातल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसटीच्या चालक, वाहकांना व एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाजगी गाड्यांचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्यभरातील एसटी वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आले होते. त्यावेळी लॉकडाऊनचा गैर फायदा उठवत अनेक खाजगी वाहतूकदारांनी अनधिकृत प्रवासी वाहतूकिस सुरुवात केली. लॉकडाऊन कालावधीमध्ये एसटी बस बंद असल्यामुळे बसस्थानक परिसरात एकही बस निदर्शनात येत नव्हती. या कालावधीमध्ये खाजगी वाहतूकदारांनी सर्रासपणे म्हसळा स्थानक परिसरातून अनधिकृत प्रवासी वाहतूक सुरू केली होती. अनधिकृत प्रवासी वाहतुकीचे म्हसळा स्थानक परिसरात साम्राज्य निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनातील वरिष्ठांकडून सुद्धा सदर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 
कधी कधी तर काही खाजगी गाड्या एसटी स्थानकाच्या दरवाजा समोरच उभ्या केलेल्या असतात. स्थानक परिसरात ट्रॅव्हल बस, मिनी बस, जिप, कार, रिक्षा, मोटारसायकल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खाजगी गाड्या उभ्या केलेल्या असतात.
म्हसळा एसटी स्थानक हे म्हसळा - श्रीवर्धन - दिघी, व म्हसळा मुंबई कडे जाणारा रस्ता या मुख्य रस्त्याला लागूनच असल्याने येथे सतत वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी, दैनंदिन कामासाठी आलेले नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. अनेक वेळा खाजगी गाड्या स्थानक परिसरात मधेच आडव्या - तिडव्या उभ्या करून चालक कुठेही फिरत असतात अशा वेळी ट्रॅफिक जॅम होत असते, मग नागरिकांसह पर्यटकांना देखील या ट्रॅफिक जॅम चा नाहक त्रास सहन करावा लागत असतो. एसटी स्थानकाच्या बाजूलाच ग्रामीण रुग्णालय असून तालुक्यात अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात अशावेळी अपघात ग्रस्तांना किंवा इतर रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना अंबुलन्स (रुग्णवाहिका) आणण्यासाठी सुद्धा जागा नसते, कारण खाजगी गाड्या रुग्णालयाच्या गेट समोरच उभ्या केलेल्या असतात. कधी कधी एसटी बस स्थानक परिसरात उभी करण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागते. तालुक्याच्या ग्रामीण भागातून हजारो नागरिक एसटी बस ने प्रवास करीत असतात, नागरिकांची स्थानक परिसरात गर्दी असते अशावेळी खाजगी वाहनांची खूप मोठी अडचण ठरत असते. एसटी स्थानक परिसरात खाजगी वाहने पार्किंग करणे आणि सातत्याने वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या खाजगी वाहनांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
एसटी स्थानकाला लागूनच असलेल्या ग्रामीण रुग्णालय म्हसळा, दिघी नाका रस्ता, म्हसळा श्रीवर्धन रस्ता सर्वत्र प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून स्थानक परिसरात होणाऱ्या अनधिकृत वाहतुकीसंदर्भात अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर भूमिका घेण्यात येत नाही. म्हसळा ते मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, विरार या प्रवाशी मार्गावर प्रवासासाठी खाजगी वाहतुकदार अक्षरशः प्रवाशांची लूट करीत असल्याचे बोलले जाते. म्हसळा ते मुंबई व उपनगरे या भागात जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात एसटी बस ची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खाजगी वाहतुकीचा मार्ग अवलंबावा लागतो. मात्र सदर बाबीकडे संबंधित परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.


◆ अनेक वेळा खाजगी वाहन चालक व मालकांना समज देऊनही बस स्थानक परिसरात खाजगी वाहन पार्किंग करीत असतात. एकदा समज दिली की वाहन पुन्हा आणून त्याच ठिकाणी लावतात. कधी कधी छोटे मोठे वाद निर्माण होतात. खाजगी वाहन पार्किंग मुले एसटी बसेस पार्किंग करण्यास अडचणी निर्माण होत आहेत असे म्हसळा स्थानक प्रमुख यांनी सांगितले.

■ प्रतिक्रिया

म्हसळा एसटी स्थानकाच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची खाजगी वाहने पार्किंग केली जातात, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खाजगी वाहन चालकांनी त्यांची वाहने एसटी स्थानकाच्या परिसरात पार्किंग न करता इतर ठिकाणी मोकळ्या जागेत पार्किंग करावी. खाजगी वाहन चालक अनेक वेळा अरेरावी करीत असल्याचे प्रकार पहावयास मिळतात, तरी खाजगी वाहन चालक व मालक यांना पोलिसांनी समज देऊन कायदेशीर कारवाई करावी."
अनिल महामुणकर ( गाव - देवघर)
सदस्य - प्रवाशी संघटना म्हसळा


"म्हसळा स्थानकात अलीकडे अनधिकृत खाजगी वाहनांची पार्किंग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याबाबत म्हसळा स्थानकातून आमच्यापर्यंत माहिती कळवली जाते. यावर कार्यवाही म्हणून याबाबत आम्ही अनेक वेळा म्हसळा पोलीस ठाण्यात खाजगी वाहने एसटी स्थानक परिसरात पार्किंग करीत असल्याचे बाबत तक्रार दाखल केलेली आहे, परंतु म्हसळा पोलीस ठाण्यातून याबाबत काहीच कारवाई केली जात नाही."
तेजस गायकवाड
आगार प्रमुख श्रीवर्धन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test