दिघी पोर्ट,राष्ट्रीय महामार्गावर वेळास येथे शेतकऱ्याचे नुकसान,डागडुजी करून देण्यास ठेकेदाराची टाळाटाळ.
महामार्गावर गतिरोधक व रॅम्स करीता ग्रामस्थांची मागणी
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
दिघी ते माणगांव मार्गे पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.या रस्त्याला आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या खूप प्रमाणात जमिनी गेल्या आहेत.घरं,घरांची छपरं गेली.आंबा-काजू सारख्या जातीची उत्पन्न देणारी झाडं गेली.काही ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना त्रास झाला आहे. अनेक ठिकाणी जाण्या-येण्याचा मार्ग सुध्दा धोकादायक झाला आहे.असेच एक शंकर शांताराम मुरकर या शेतकऱ्याची मौजे-मूळ वेळास येथील गट नं.३९५/अ-२,क्षेत्र १२ गुंठे होऊन ५२ गुंठेतील ८/१० आंब्याची उत्त्पन्न देणारी झाडं याच राष्ट्रीय महामार्गाला गेली आहेत.लगत असलेल्या मूळ-वेळास पाणीपुरवठा नळ-पाणी योजनेची पाईप लाईन गेली आहे.त्याचं नुकसान झालंच शिवाय शेतात जाण्या करीता असलेला १२ फुटांचा रस्ता होता.त्या रस्त्याला दोन बाजूने उघडणारा लोखंडी गेट होता.तो उघड-बंद होईनासा झाला आहे.शेतात जाण्याचा रस्ताच राहिला नाही.खाच खळग्यांनी घसरण झाली.वाहनं काय पण पायी चालत जाण्या लायक सुध्दा रस्ता राहिला नाही.तो पूर्ववत करण्यासाठी तिथे जवळ पास ७/८ डंपर मातीचा भराव व त्यावर सिमेंट काँक्रीट रॅम्प अशा स्वरूपाचे काम झाल्यास तेथील अडचण दूर होईल.या अडचणी करीता या महामार्गावर काम करणारे प्रसिध्द ठेकेदार मे.जे.एम.म्हात्रे यांचे अभियंता प्रसाद बढे यांच्या कडे गेले काही महिने संपर्क साधणार्यांना उडवा-उडवीची उत्तर देत आहेत.त्यातूनच मी करतो.मी बघतो.मी येतो.असं वक्तव्य करून,शब्द देऊन देखील आज तागायत तेथील डागडुजी करून देण्यास टाळाटाळ करत आहेत.या एक दोन दिवसात तेथील डागडुजी केली नाही तर येत्या पावसात थोडा फार राहिलेला रस्ता वाहून जाईल.यामुळे तेथील शेतीचे अधिक प्रमाणात नुकसान होणार आहे.नाईलाजास्तव या सम्बंधीची तक्रार मा.कार्यकारी अभियंता एम.एस.आर.डी. मुंबई, मा.प्रांताधिकारी मा.तहसिलदार श्रीवर्धन,मा.दिघी सागरी पोलीस ठाणे यांच्या कडे लेखी स्वरूपात शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.
मौजे-मूळ वेळास ग्रामस्थांची गेले कित्येक महिने गतीरोधक करीता मागणी आहे.तसेच दळवी वाडी व गवळी वाडी(शाळेच्या समोर) कडे जाणाऱ्या रस्त्याला रॅम्स असणे आवश्यक आहे.या अतिमहत्वाच्या गरजा आहेत.त्या पूर्ण कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.