श्रीवर्धनच्या गाव - वाड्यांवर नेटवर्क सुविधांचा बोजवारा
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
श्रीवर्धन तालुक्याला पर्यटनाचा दर्जा मिळाला खरा मात्र, येथील बोर्लीपंचतन परिसरात ९ गावांचा मोबाईलवरून होणारा संपर्क तुटला आहे. वारंवार होणाऱ्या नेटवर्कबाबतच्या अडचणीमुळे येथील मोबाईलधारकांना बीएसएनएल सेवा ही त्रासदायक बनली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील कासारकोंड, धनगरमलई, नागलोली मधलीवाडी, नागलोली, नागलोली नवीवाडी, देवखोल, बोर्ला, बोर्ला रसाळवाडी, वावेपंचतन या एकूण ९ गावांना नेटवर्क सुविधा मिळावी यासाठी चार वर्षांपूर्वी बीएसएनएल कंपनीचे टॉवर याठिकाणी बसवण्यात आले. पण सुरुवातीपासूनच या यंत्रणेत सातत्याने बिघाड असल्याने हा दुर्गम भाग म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी व वरिष्ठांचे कायम दुर्लक्ष केले. परिणाम काय तर बीएसएनएलची दूरध्वनी सेवा कायमचीच खंडित होत राहिली. अद्यापही या सरकारी कंपनीच्या सेवेवर अवलंबून असलेला ग्रामीण भाग मात्र त्रस्त झाला आहे.
या तंत्रज्ञान विश्वात इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. सर्वत्र ग्रामीण भागातून इंटरनेट सेवेचा मोबाईलधारक प्रचंड प्रमाणात वापर करीत आहेत. येथील गावांची १६०० हुन अधिक लोकसंख्या आहे. यातील अनेकजण कामानिमित्त मुंबईस्थित असल्याने कित्येक वेळा या आडमार्गावर कोणतीच सुविधा मिळत नाही. अचानक तसा प्रसंग बेतला तर रात्रीबेरात्री कोणत्याही मदतीसाठी आजूबाजूंच्या गावांकडे संपर्क साधावा लागतो. मात्र, अशा वेळेला संपर्क होत नसल्याने कंपनीच्या सेवांना स्थानिक नागरिक वैतागल्याचे दिसत आहे.
बीएसएनएलच्या अशा सेवेमुळे गावाकडील ग्राहक खूप त्रस्त असल्याने त्यांच्यात या कंपनीबद्दल तीव्र नाराजीचा सूर आहे. ही सरकारी सुविधा असूनसुद्धा आमच्या गावांना नेटवर्क मिळत नाही, हे दुर्भाग्यच.
- सुनील रिकामे, मुंबईस्थित, नागलोली.
आमच्या भागात कोणतीच नेटवर्क सुविधा नाही. काही दुःखद प्रसंगाला नेटवर्क नसल्याने आम्हा गाववाल्यांना मोठया संकटाला तोंड द्यावे लागते. आज ही व्यथा मांडताना मोठी खंत वाटत आहे.
- जयेश जाधव, स्थानिक रहिवासी.