विकास कामे दर्जेदार झाली पाहिजेत - खासदार सुनिल तटकरे यांची अधिकारी वर्गाला विनंती
● घुम - रुद्रवट गावातील विकास कामांचे खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते उद्घाटन
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
शासनाकडून गावागावात विकास कामे करण्यासाठी मोठ्या मेहनतीने निधी मंजूर करून आणावा लागत असतो त्यामुळे मंजूर करण्यात आलेली विकास कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी 14 मे रोजी घुम - रुद्रवट गावातील विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले आहे.
जिल्हा परिषद सेस योजनेमधून मंजूर करण्यात आलेले 2.99 लक्ष खर्चाचे घुम अंतर्गत रस्त्याचे आणि रुद्रवट येथे पाणी योजनेचे उद्घाटन खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकपणे बोलताना कामे दर्जेदार झाली पाहिजेत असे सुचोवात करून एकप्रकारे आपल्याच पक्षाचे पदाधिकारी व कामे करणारे ठेकेदार यांना कानमंत्र देऊन संबंधित अधिकारी वर्ग यांना विनंती केली आहे. रुद्रवट गावात नळस्टँड पोस्टचे उद्घाटन करून भविष्यात घराघरात नळ कनेक्शन कसे देता येईल याबाबत नियोजन केले जाईल असे सांगितले. बऱ्याच वर्षांपासून घुम - रुद्रवट रस्त्याचे काम रखडलेले आहे याबाबत माहिती देताना खासदार तटकरे यांनी सांगितले की अलिबागचे पंडितशेठ पाटील यांचे कंपनीने सदर रस्ता करण्याचे काम घेतले होते परंतु त्यांनी काम सुरू केले नाही त्यामुळे त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट मधे टाकण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या काही काळात घुम -रुद्रवट रस्त्याचे काम मार्गी लागेल असे आश्वाशीत केले. घुम गावात प्राचीन काळापासून स्वयंभू शंकराची पिंडी असलेले शंकराचे मंदिर आहे या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचे कामासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल तसेच ग्रामपंचायत कार्यालय नाही तरी नवीन कार्यालयासाठी एक वर्षाचे आत निधी मंजूर करून दिला जाईल असे अभिवचन ग्रामस्थांना दिले.
तसेच समाजाचे हित कशात आहे हे ओळखता आले पाहिजे असे सांगून जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले असल्याने या भागाचा विकास अधिक गतिमान पद्धतीने होत आहे व ते भविष्यात कायम राहील असेही खासदार सुनिल तटकरे सांगितले.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत जेष्ठ नेते अलिशेठ कौचाली, तालुका अध्यक्ष समीर बनकर, मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, महिला तालुका अध्यक्षा रेशमा कानसे, माजी सभापती छायाताई म्हात्रे, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, शेखर खोत, जमीर नझीरी, लहू शेठ म्हात्रे यांसह घुम - रुद्रवट गावातील ग्रामस्थ, मुंबई मंडळ, महिला मंडळ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.