मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची मोटरसायकलला जोरदार धडक , एकाचा मृत्यू ,एक जण जखमी
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागोठणे येथील हॉटेल रुची समोर महामार्गावर भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या संदर्भात नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दि. १४ रोजी पहाटे ०६.३० वाजण्याच्या सुमारास प्रथमेश ऋषीनाथ म्हसकर (वय २३ वर्षे) रा. नालासोपारा पूर्व व सुभाष सहादेव बोतरे (वय २३ वर्षे) रा. ताडदेव पोलिस चौकी जवळ मुंबई दोघेही मुळचे राहणार आडी बंदरवाडी, ता. म्हसळा जि.रायगड हे आपल्याकडील एमाहा कंपनीच्या
एफझेड मोटरसायकल क्र. एमएच ४८ सीए ०३५५ ने मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे म्हसळा या ठिकाणी जात असताना याचवेळी ट्रक क्र. एमएच ४६ एआर ८१४१ यावरील चालक नाव व राहणार माहित नाही याने आपल्या ताब्यातील सदरहू ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने चालवित घेऊन मुंबई बाजूकडून माणगावच्या दिशेने जात असताना नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल रुची या ठिकाणी आला असता ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुढे जात असलेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील सुभाष बोतरे या युवकाचा गंभीर स्वरुपाच्या दुखापत झाल्याने मृत्यू झाला तर प्रथमेश म्हसकर हा या अपघातात जखमी झाला.या अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून या अपघाताची नागोठणे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाता संदर्भात नागोठणे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. ब्रिजेश भायदे हे पुढील तपास करीत आहेत.