नागोठणे जवळील तामसोली गावात आगीचे तांडव दोन घरे जळुन खाक, लाखोंचे नुकसान.
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील तामसोली येथे लागलेल्या आगीमध्ये दोन घरे जळुन खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने दैव बल्लतर म्हणुन यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग नक्की कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्यापही समजले नाही.ही घटना शनिवार ( दि .१४ ) रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतीत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या तामसोली येथिल दशरथ गजानन गायकवाड यांच्या घराला रात्री अचानक आग लागली. आग लागल्याचे प्रथमतः तामसोली गावातील रहिवासी तसेच ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश डोबले यांच्या लक्षात येताच त्यांनी यांची माहिती गायकवाड कुटुंबियांना तसेच पोलिस पाटील महेश शिरसे यांना दिली. पंरतु काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण करीत बाजुला असलेल्या निता नारायण गायकवाड यांच्या घराला देखील आगीने वेढा घातला. या दोन्ही घरामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडे असल्यामुळे आग ही वा-यासारखी पसरली. सुदैवाने या घरातील दोन्हीही कुटुंबे कामानिमित्ताने शहरामध्ये राहत असल्यामुळे एका घराला लाॅक होते. तर दुस-या घरातील कुटुंब हे शेजारीच असलेल्या लग्नकार्यासाठी दोन दिवसांपुर्वी नुकतेच गावी आले होते. पंरतु ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या घरातील कुटुंब लग्नकार्य असलेल्या ठिकाणी गेल्यामुळे होणारी जीवितहानी ही टळली. मात्र या घटनेमध्ये दोन्ही घरे जळुन पुर्णतः खाक झाली असुन लाखोंचे नुकसान झाले आहे.तसेच शेजारीच असलेल्या सदानंद शिवराम चव्हाण यांच्या घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे समजताच तामसोली गावातील ग्रामस्थ तसेच तरुणांनी पाणी ओतून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पंरतु आग आटोक्यात येत असतांनाच पुन्हा एकदा आगीने रौद्ररूप धारण केल्याचे पाहता येथुन जवळच असलेल्या जिंदाल कंपनीच्या अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांना पाचारण करण्यात आले. तात्काळ या अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान या घटनेची माहीती तामसोली येथिल पोलिस पाटील महेश शिरसे यांनी नागोठणे पोलिसांना कळवताच नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवार, तसेच कर्मचारी गणेश भोईर, विनोद पाटील, गंगाराम डुमणे, रामनाथ ठाकुर, सत्यवान पिंगळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने या घटनेचा पंचनामा केला. या घटनेच्या बाबतीत शासनाने या कुटुंबियांना लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गायकवाड कुटुंबियांनी केली आहे. याबाबतीत पुढील तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.