तोंडसुरे जंगमवाडी ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती
● पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमधे होतात वाद
● लाखो रुपयांचे खर्चाचे योजनेचा उडतोय बोजवारा
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत तोंडसुरे जंगमवाडी गावाला पाणी पुरवठा सुरळीत होत नसून 30 ते 35 कुटुंबांना दोन हांडे सुद्धा पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे
येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने लाखो रुपये खर्चाचे तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडाला असल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली असून या योजनेशी संबंधित असलेले अधिकारी व कमिटी वर्गाचा ढिसाळ कारभार पुढे येत असल्याचे दिसून येते.
पुरेसा पाणी मिळत नसल्याने गावातील महिलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा पाणी भरणेवरून महिलांमध्ये भानगडीचे वातावरण तयार होत असते. पाण्याच्या या भीषण समस्येबाबत जंगमवाडी ग्रामस्थांनी अनेकवेळा तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे कार्यालयाला ( ग्रामीण पाणी पुरवठा विभाग म्हसळा ) यांचेकडे तक्रार केली असता आमच्याकडे या योजनेचे काम करणेसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही हे काम करू शकत नाही असे उत्तर देत असतात अशी माहिती ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे जंगमवाडी अध्यक्ष मल्लिकांत जंगम यांनी दिली आहे.
तसेच गावचे तरुण कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन जंगम यांनी सांगितले की तोंडसुरे जंगमवाडी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतुन पाणी पुरवठा करावयाचा आहे परंतु संबंधित शासकीय पातळीवर नियोजन होत नसल्याने आम्हाला पाणी मिळत नाही, पाण्यासाठी नळाच्या स्टँड वर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात, अनेक वेळा भांडण होत असते. नवीन योजना तयार होईपर्यंत सद्यस्थितीत पाण्याची समस्या दूर करणेसाठी शासनाकडून काहीतरी उपाययोजना करणेत यावी अशी मागणी सुदर्शन जंगम यांनी केली आहे.
या महत्त्वाच्या समस्येबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग म्हसळा कार्यालयातील कनिष्ट अभियंता यशवंत बाक्कर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की तोंडसुरे जंगमवाडी येथील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही ही वस्तुस्थिती खरी असून याबाबत आमच्या कार्यालयाला नागरिकांनी वेळोवेळी अवगत केलेले आहे. सदर गावासाठी तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत असतो. परंतु आता ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग केलेली आहे. या योजनेच्या दुरुस्ती साठी आमच्या विभागाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने आम्ही या योजनेची दुरुस्ती करू शकत नाही. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केलेले आहेत असेही कनिष्ठ अभियंता यशवंत बाक्कर यांनी सांगितले आहे.