• म्हसळा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली सभा संपन्न
● दुर्गम भागातील लाभार्थी शासकीय अनुदान योजनेपासून वंचित राहू नयेत - तालुका समिती अध्यक्ष महेश शिर्के यांची सूचना
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
महाराष्ट्र राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचे शिफारशीने गठीत केलेल्या म्हसळा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली पाहुणचार सभा सोमवार, दिनांक १८/४/२०२२ रोजी म्हसळा तहसीलदार कार्यालयात समितीचे अध्यक्ष महेश शिर्के यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी समितीचे सचिव तथा तहसीलदार समीर घारे, नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यांसह महाविकास आघाडीतील नवनियुक्त समिती सदस्य महादेव भिकु पाटील, निशा पाटील, शमीम रियाज फकीह, यशवंत गमरे, मोरेश्वर पाटील, अमर ठमके, शुभांगी पवार, ग्राम विस्तार अधिकारी एस.डी.शिंदे उपस्थित होते. समिती पाहुणचार सभेत समिती अध्यक्ष महेश शिर्के आणि सर्व सदस्यांचे समिती सचिव तथा तहसीलदार समीर घारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अध्यक्ष महेश शिर्के यांनी समितीचे कामकाजाबाबत चर्चा करताना सन्माननिय सदस्यांनी आपल्या विभागातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आपणहुन लक्ष देऊन प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून कुठल्याही दुर्गम भागातील लाभार्थी शासकीय अनुदान योजनेपासून वंचित राहू नयेत असे सुचित केले.
सद्यस्थितीत म्हसळा तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ८०६, अनु जाती ४९, अनु.जमाती १०, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना ५८६, अनु.जाती ८, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ३०५, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना ११७, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन १३, इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 3 असे एकूण १८९७ लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती तहसीलदार समीर घारे यांनी नवनियुक्त समिती सदस्यांना दिली.