• दिघी - आगरदांडा जलवाहतूक प्रवास बनला संभ्रमाचा
• दोन फेरी बोट मधील प्रवास दरात ५० रुपयांची तफावत
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
श्रीवर्धन व मुरुड या दोन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनाला जोडणारा दिघी बंदरातील 'फेरी बोट' प्रवास प्रवाशांसाठी सोइस्कर व पर्यटकांना आकर्षित करणारा ठरत आहे. मात्र, या जलवाहतूक प्रवासामध्ये दोन बोटीतील तिकीट दरातील फरकाने प्रवाशी वर्ग संभ्रमात पडला आहे. याबाबत मेरिटाईम बोर्डाकडे तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने प्रवाशी संताप व्यक्त करत आहे.
आगरदांडा व दिघी बंदर हे दोन महत्वाचे बंदर आहेत. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या तीन तालुक्याला जोडणारा जलमार्ग हा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे येथे दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मुरूड, अलिबाग आदी नयनरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारी जंगल जेटीची निर्मिती करण्यात आली. या जेट्टीवरून सुवर्णदुर्ग शिपिंग मारिन सर्व्हिसेस व दिघी जलवाहतूक संस्था या दोन संस्थेची अधिकृतरित्या दिघी ते आगरदांडा व आगरदांडा ते दिघी अशी फेरी बोट सेवा दिली जात आहे. दिघीहुन सूटनाऱ्या जंगलजेट्टी मध्ये दुचाकी व सहा चाकी वाहन नेण्याची सुविधा असल्याने या मार्गाचा वापर वाहनधारकांकडून मोठया प्रमाणात होतो. मात्र, प्रत्येक प्रवासी भाडे व दोन बोटीमध्ये वाहन भाडे दरात फरक असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचा सावळा गोंधळ नेहमीच पाहायला मिळत आहे. तिकीट दरात आमची लूट होत असल्याचं आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
आगरदांडा ते दिघी या एकाच मार्गावर चालणाऱ्या दोन फेरी बोटीच्या तिकीट दरात तफावत असल्याने प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी आहे. याबाबत मेरिटाईम बोर्डाकडे तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. तर या दोन्ही बोटीच्या तिकीट दरात मेरिटाईम बोर्डाने लवकरच सुसूत्रता आणावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
एकाच मार्गावर धावणाऱ्या दोन बोटीतील तिकीट दर -
सुवर्णदुर्ग शिपिंग मारिन सर्व्हिसेस व दिघी जलवाहतूक या दोन संस्थेच्या फेरी बोट मधील प्रवासी भाडे ३० रुपयांनी सारखेच आकारले जाते. मात्र, मोटारसायकल सह चालक असे वाहनांसाठी आकारण्यात येणारे तिकीट दर एका बोटीतील ८० रुपये तर दुसऱ्या बोटीत ५५ रुपये आहे. यामध्ये २५ रुपयांचा तफावत आहे. तर कार, ट्रक अशा अनेक विविध वाहनात अधिक फरक असल्याची प्रवाशांची ओरड आहे.
दिघी ते आगरदांडा या एकाच जलमार्गावर येऊन जाऊन सारख्याच अंतरात दोन फेरी बोट चालतात. मग या दोन बोटीतील तिकीट दरात फरक का?
- हरीश दिघीकर, दिघी रहिवासी.
तफावतीचा अधिकाऱ्यांनी केला खुलासा -
दिघी येथील जलवाहतूक करणाऱ्या सुवर्णदुर्ग शिपिंग मारिन सर्व्हिसेस व दिघी जलवाहतूक संस्था या दोन संस्थानी भाडे वाढ होण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार सुवर्णदुर्ग शिपिंग मारिन सर्व्हिसेस यांचे भाडे वाढ मंजूर झाले आहे. तशीच दिघी जलवाहतूक संस्थेची मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रवासातील तिकीट दरात तफावत आहे.
- प्रकाश गुंजाळ, दिघी बंदर निरीक्षक.