• श्रीवर्धन महसूल विभागाचे कर्मचारी संपावर
• कार्यालयीन कर्मचारी, कोतवाल देखील संपामध्ये
• कामकाज पूर्ण ठप्प, नागरिकांचे प्रचंड हाल
बोर्ली पंचतन - अभय पाटील
संपूर्ण राज्यामध्ये सुरू असलेल्या महसूल कर्मचारी संघटनेचा बेमुदत बंद मध्ये श्रीवर्धन तहसील कार्यलयातील कर्मचारी देखील सहभागी असल्याने नागरिकांचे या संपामुळे गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. या संपामध्ये अव्वल कारकून, लिपिक सहभागी असून त्यांना, नायब तहसीलदार, तलाठीव कोतवाल संघटनेचा पाठींबा आहे तर शासन दरबारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे महसूल संघटना श्रीवर्धन तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले.
राज्यातील महसूल विभाग महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका महसूल सहाय्यक आकडे दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसूल सहाय्यक भरती साठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे तसेच अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती चे प्रस्ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षापासून प्रलंबित असल्याचे दिसून येते शासन निर्णय व महसूल व वन विभाग दिनांक १० मे २०२१ अन्वये नायब तहसीलदार संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवा जेष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्या बाबत शासनाने पत्र काढलेले आहे परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्द करावे तसेच इतर मागण्या बाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनांनी ४ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे गेल्या ४ दिवसांपासून महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी श्रीवर्धन तहसील कार्यालय ओस पडले असून त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊन नागरिकांची कामे खोळंबली आहेत
शैक्षणिक तसेच अन्य कामासाठी लागणारे दाखले, जमीन किंवा इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासह जातीचे प्रमाणपत्र, जयंती-उत्सव काळात लागणारे परवाने तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता, आधार प्रमाणीकरण, कागदपत्रांचे (केवायसी) अद्ययावतीकरण आदी कामांसाठी नागरिकांचा तहसील कार्यालयात राबता असतो. मात्र, गेल्या चार दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने या सर्व कामांचा खोळंबा झाला असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
प्रलंबित मागण्यांबाबत शासनाला वारंवार पत्रक पाठवूनही दखल घेतली जात नसल्याने आमचा संप बेमुदत काळापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीवर्धन महसूल संघटने सोबत तालुका कोतवाल संघटनेचा देखील या संपास पाठींबा असल्याचे कोतवाल संघटना तालुका सचिव गणेश महाडिक यांनी सांगितले