Type Here to Get Search Results !

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात साजरा


नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात साजरा 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 नागोठणे व मुरावाडी गावची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचा रविवारी (दि.१७)सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात सुरु झालेला चैत्र पालखी सोहळा नागोठणे शहारातील विविध भागात भक्तीमय वातावरणात साजरा होऊन चौथ्या दिवशी बुधवारी (दि. २०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर निर्विघ्नपणे पूर्ण झाला. पालखी मंदिरात पोचल्यानंतर ग्रामदेवतेच्या पालखीला सहकार्य करणारे नागोठणे ग्रामपंचायत, नागोठणे पोलीस ठाणे, वीज वितरण कंपनी, नागोठण्यातील अनेक संस्था, संघटना, सामजिक मंडळे तसेच प्रत्येक आळीतील अध्यक्ष, ग्रामस्थ या सर्वांचे उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष नितीन राऊत यांनी आभार मानले. तर नवीन उत्सव समितीचे हे पहिलेच वर्ष असूनही श्री जोगेश्वरी मातेचा हा पालखी सोहळा आनंदीमय व खेळीमेळीच्या वातावरणात तसेच कोणतेही गालबोट न लावता पार पाडणा-या उत्सव समितीचे नागोठण्यातील सर्वच भागातील नागरिकांतून कौतुक होत आहे. 
कोरोनामुळे दोन वर्षे पालखी सोहळ्यात खंड पडल्याने सर्वच ठिकाणी ग्रामस्थांनी तसेच तरूण-तरूणी, महिला व आबाल वृध्दांनी पालखीचे वाजत-गाजत- नाचत उत्साहात स्वागत केले. या पालखी सोहळ्या निमित्ताने नागोठण्यातील परंतु नोकरी, व्यवसाया निमित्ताने गावाबाहेर असलेले चाकरमानी, ग्रामस्थ आणि माहेरवाशिणी गावात आवर्जून परतल्या होत्या. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांना आपापल्या घरासमोर मातेचे दर्शन झाले. मातेच्या स्वागतासाठी सर्वत्र आकर्षक रांगोळी, आकर्षक सजावाटी, विद्युत रोषणाई, तसेच स्वागतकमानी उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण गावात एक आनंदाचे, उत्साहाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे यशस्वी होण्यासाठी श्री जोगेश्वरी माता विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन राऊत, उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर, सचिव मंगेश कामथे, सहसचिवपदी संजय नांगरे, खजिनदार प्रथमेश काळे, सहखजिनदार सुदर्शन कोटकर आदींसह विश्वस्त समिती व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test