नागोठणे येथील शिवसह्याद्री मित्र मंडळ गवळआळी तर्फे श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा संपन्न
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील चैत्र शुद्ध दि. १० एप्रिल रोजी रामनवमीच्या शुभदिनाचे औचित्य साधत समस्त गवळआळी ग्रामस्थ व शिवसह्याद्री मित्र मंडळ गवळआळी तर्फे श्रीसाईबाबा उत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सलग १२व्या श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळ्यासाठी नागोठणे के. एम. जी. विभागातील साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता. या सोहळ्याचे आयोजन गवळआळीतील श्री गणेश, राधाकृष्ण, श्री साईबाबा मंदिरात करण्यात आले होते.
श्रीसाईबाबा उत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ठीक ७.०० वाजता श्री साईबाबांना दुग्धअभिषेक घालून करण्यात आली. त्यानंतर अनेक पूजा विधी व होमहवन करण्यात आले. दुपारी ठीक १२.०० वा. श्री साईबाबांची महाआरती घेण्यात आली. यावेळी साई भक्तांची मांदियाळी पहावयास मिळाली. महाआरतीने संपूर्ण गवळआळी परिसर हा भक्तिमय वातावरणाने प्रफुल्लित झाला होता. या सोहळ्यानिमित्त गवळआळीतील तरुण व सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले साईभक्त किरण वादळ यांनी उपस्थित भाविकांसाठी साई भंडाऱ्याचे आयोजन केले होते. हा साई भंडारा घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.तर सायंकाळी ६ वाजता श्रीसाईबाबांच्या पालखीचा आरंभ झाला.ही पालखी संपूर्ण गवळआळीत वाजतगाजत फिरविण्यात आली. यावेळी अनेक तरुण तरुण लहान मुलान पालखीत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. अखेर रात्री १० वाजता पालखीची सांगता करण्यात आली त्यावेळी साईभक्त प्रसाद जोगत यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी श्रीसाईबाबा उत्सव व पालखी सोहळ्यासाठी गवळआळी मधील श्रीगणपती, राधाकृष्ण साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा मंदिर विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या हस्ते साईबाबांची मानाची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री गणेश, राधा कृष्ण, श्री साईबाबा मंदिराचे विश्वस्त कमिटी अध्यक्ष विलासजी चौलकर, शिवसह्याद्री मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप राऊत, ग्रामस्थ मंडळ गवळआळी चे अध्यक्ष रवींद्र वाजे आणि सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व महिला भगिनींनी मेहनत घेतली.शेवटी सगळ्यांचे आभार साईभक्त प्रसाद जोगत यांनी मानले.