• संदेरी आदिवासीवाडी येथे कातकरी उत्थान अभियान अंतर्गत सप्तसूत्री कार्यक्रम
● आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास स्थलांतर रोखण्यास मदत होईल - तहसीलदार समीर घारे यांचे प्रतिपादन
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यातील संदेरी आदिवासीवाडी येथे नागरिकांना विविध शासकीय दाखले वाटप आणि मच्छीमारी करण्यासाठी होडीची व्यवस्था या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्याचे तहसीलदार समीर घारे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी तहसीलदार समीर घारे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की माननीय जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सप्तसूत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी व्यक्तींचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याकरिता सर्व दीप विकास संस्था माणगाव यांच्या माध्यमातून कातकरी व्यक्तींना संदेरी येथे मासेमारी व्यवसायासाठी होडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या होडीचा वापर करून करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे संदेरी आदिवासीवाडीतील दहा कुटुंबांना रोजगार मिळणार असून त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल असे सांगून तहसीलदार घारे यांनी सर्व दीप विकास संस्था माणगाव यांचे लोकोपयोगी कामांचे कौतुक केले. तसेच तहसीलदार यांचे हस्ते होडी ची विधिवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमाचे दरम्यान आदिवासी नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्यावेळी म्हसळा तहसीलदार समीर घारे, मंडळ अधिकारी सलीम शहा, तलाठी जितेंद्र शेळके, रा.भा.दुकानदार बिलाल हजवाने, सर्व दीप विकास संस्थेचे पदाधिकारी, संदेरी आदिवासीवाडीतील गाव अध्यक्ष, महिला मंडळाचे अध्यक्ष, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.