भरडखोल येथे संत निरंकारी पद्धतीने विवाह सोहळा
रायगड वेध रमेश घरत शिस्ते
तालुक्यातील भरडखोल येथे संत निरंकारी पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. रविवारी (दि. १०) रोजी दुपारी झालेल्या या कार्यक्रमात संत निरंकारी मराठी मासिक पत्रिकेचे संपादक चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला.
भरडखोल मधील संदीप किल्लेकर यांची कन्या मृदुला व पनवेल येथील महादेव अडसूळ यांचा मुलगा सिद्धेश यांचा विवाह होता. झोनल इंचार्ज म. प्रकाश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत साध्या पण प्रभावशाली पद्धतीने आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’ (पुष्पहार) आणि जोडप्याच्या गळयात ‘सामायिक हार’ (सांझाहार) घालून करण्यात आला, त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्राच्या रुपात असलेल्या चार ‘निरंकारी लांवां’ (मंगलाष्टके) चे गायन करण्यात आले. प्रत्येक लांवांच्या शेवटी सद्गुरु स्वरूप महात्मा व उपस्थित भाविक-भक्तगणांकडून वधू-वरांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. कोणत्याही प्रकारची विद्युत रोषणाई, फटाके तसेच वाजंत्री असं अनावश्यक खर्च पाहायला मिळाला नाही. यावेळी स्टेजविराजमान महात्मा जाधव यांनी सांगितले की, संत निरंकारी पद्धतीने विवाह सोहळ्यात विधी केल्या जात नाहीत तर संस्कार दिले जातात. गृहस्थाश्रमात प्रवेश करत असताना जबाबदारीची जाणिव करून देतात. १९७३ साली सालापासून मिशनच्या माध्यमातून साध्या पद्धतीने विवाह सोहळयास सुरवात झाली. कोणत्याही पद्धतीचे अवडंबर न ठेवता संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून वार्षिक संत समागमामध्ये मोठ्या प्रमाणावर सामुहीक विवाह सोहळे संपन्न झाले आहेत. लग्न सोहळ्याचे निमित्त साधुन आत्म्याला परमात्म्याची ओळख करून मानवी जीवनाची ईती कर्तव्ये पार पडण्याची संधी या माध्यमातून प्राप्त होत असते असे यावेळी सांगितले. संत निरंकारी मंडळ साध्या विवाहपद्धत तसेच वृक्षारोपण, आरोग्य शिबीर व स्वच्छता अभियान असे अनेक सामाजिक उपक्रम राबवते असे यावेळी सांगितले.
या विवाह सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, अलिबाग, पेण व पनवेल येथून संत महात्मे व आप्तेष्ट उपस्थित होते. क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल मंडळींनी यावेळी उत्तम सेवा केली. बारामती येथून आलेले गायकवाड गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले तसेच संत निरंकारी मंडळ रायगड झोनचे क्षेत्रीय प्रबंधक महात्मा प्रकाश म्हात्रे यांनी आभारप्रदर्शन केले.