Type Here to Get Search Results !

म्हसळ्यात राजरोसपणे होतंय "जांभा दगडांची" "ओव्हरलोड वाहतूक"


म्हसळ्यात राजरोसपणे होतंय "जांभा दगडांची" "ओव्हरलोड वाहतूक"

◆ पोलिसांसह, महसूल विभागाचे दुर्लक्ष..?

◆ अपघात घडल्यास जबाबदार कोण..?


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


म्हसळा तालुक्यातील अनेक महसुली गावांच्या हद्दीत जांभा दगड उत्खनन जोरदार पणे सुरू आहे. अनेक ठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याची शक्यता असून जांभा दगड उत्खननाकडे मात्र महसूल विभाग कानाडोळा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या ज्या ठिकाणी दगड उत्खनन खाणी सुरू आहेत त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणे गरजेचे असताना संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग मात्र कार्यालयात बसुन जांभा दगड उत्खनन करणेचा परवाना (परमिशन) देत आहेत. दगड उत्खनन करणाऱ्या मालकांसाठी महसूल विभागाचे काही नियम व अटी आहेत हे नियम फक्त कागदावरच लागू असून प्रत्यक्षात या नियमांचे कोणी पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे.
    म्हसळा तालुक्याच्या ग्रामीण भागातून तालुक्याचे वेगवेगळ्या गावात आणि तालुक्याचे बाहेर जांभा दगडांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून ही वाहतूक ओव्हरलोड स्वरूपात सुरू आहे. अनेक वेळा मुख्य रस्त्यांवरून भरधाव वेगाने गाडी चालविताना आढळून येतात तर ड्रायव्हर कधी कधी नशेत गाडी चालवत असतात आणि कानामध्ये एअरफोन लावून गाडी चालवितात, बऱ्याच वेळा जांभा दगड भरलेले मालवाहतूक ट्रॅक्टर व मोठे ट्रक रस्त्याचे मधेच उभे करून ठेवतात, त्यामुळे त्या रस्त्यावरून प्रवास करणारे अन्य प्रवाशी वर्गास अडचणी निर्माण होत असतात. ट्रॅक्टर व ट्रक मधे भरलेले दगड कसेही आडवे - तिडवे भरून टाकलेले असतात कधी कधी तर हे दगड मधेच रस्त्यात पडलेले आढळतात. गाड्यांचे दरवाजे, ब्रेक, आरसे निकामी असतात आणि वाहतुकीसाठी जुन्या गाड्या वापरतात. वाहतूक करताना दगडांवर अच्छादन (कापड) नसते त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. या धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व बाबतीत स्थानिक पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करीत आहेत.
   ग्रामीण भागातील चांगले सुस्थितीत असलेले डांबरी पक्के रस्ते जांभा दगडांच्या सततच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. अनेक जोडरस्त्यांवर पूर्णपणे धुरळा साचलेला आहे, या धुरल्यामुळे बाईकस्वार घसरत असून अपघात होत आहेत. खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी संबंधित जांभा दगड उत्खनन करणारे मालकांनी केली पाहिजे.
   जांभा दगड उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणी कोणत्या परराज्यातून किंवा जिल्ह्यातुन कामगार आले आहेत याची नोंद नाही, अनेक ठिकाणी या कामगारांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असतो.
● या भागात सुरू आहे जांभा दगड उत्खनन :-

म्हसळा तालुक्यातील खामगाव मंडळ अंतर्गत वांगणी, मांदाटने, कुडगाव, कोकबल या गावांच्या हद्दीत तर म्हसळा मंडळ मधे घुम, नेवरूळ, पानवे, निगडी - दगडघुम या गावांच्या हद्दीत जांभा दगड उत्खनन सुरू आहे. म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी वनांचे क्षेत्र असुन वनविभागाच्या खाजगी वनांचे तरतुदीची देखील पायमल्ली होत असल्याचे नाकारता येत नाही त्यामुळे वनविभागाने देखील जांभा दगड उत्खनन ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या भागात लक्ष दिले पाहिजे.
"जांभा दगड वाहतूक करणाऱ्या गाड्या राजरोसपणे ओव्हरलोड दगड भरून भरधाव वेगाने मुख्य रस्त्यावरून वाहतूक करीत आहेत, काही ड्रायव्हर गाडी चालवताना दारूच्या नशेत असतात, रस्त्यात मधेच कुठेही गाडी उभी करून ठेवतात, ट्रॅक्टर मधे भरलेले दगड फाळक्याच्या वरती कसेही आडवे उभे भरलेले असतात. तसेच दगड माती भरलेल्या गाड्यांच्या वरती कापड देखील बांधलेले नसतात, महसूल विभागाने या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्री.किरण पालांडे
जिल्हा शांतता कमिटी सदस्य  
अध्यक्ष - वन समिती कोळे ग्रामपंचायत

"ग्रामपंचायत ठाकरोली हद्दीतील कोकबल परिसरात जांभा दगड उत्खनन सुरू असून मोठ्या प्रमाणात दगडांची वाहतूक केली जाते. कोकबल गाव व कोकबलवाडी या दोन गावांची मिटिंग झालेली असून मे महिन्याचे नंतर या भागात एकही खाण सुरू करणेस परवानगी दिली जाणार नाही असे ठरले आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, मुख्य रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून सगळीकडे धुरळा जमा झाला आहे. 
सौ.स्नेहा सुनिल सोलकर
सरपंच - ग्रुप ग्रामपंचायत ठाकरोली

"तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी जांभा दगड उत्खनन सुरू आहे त्या सर्व खाण मालकांना मंडळ अधिकारी यांचे मार्फत बोलावून त्यांना समज देण्यात येईल, तसेच मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचा सूचना देण्यात येतील. जांभा दगड उत्खनन व दगडांची वाहतूक करताना शासनाचे नियमांचे पालन केले पाहिजे, जर नियमांचे पालन केले नाही तर संबंधित खाण मालकांचा परवाना रद्द करण्यात येईल. 
श्री.समीर घारे
तहसीलदार म्हसळा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test