• नागोठणे पोलीसांकडून ऐनघर-वाघ्रणवाडी येथील गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त
• चाळीस हजार रुपये किंमतीचा ४०० लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
रोहा तालुक्यातील नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऐनघर ग्रामपंचायत विभागातील जंगल भागात काही ठिकाणी अवैधरित्या होणारी गावठी दारुची विक्री कारवाई करत काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली होती.मात्र पुन्हा एकदा जोमाने या विभागातील अनेक ठिकाणी गावठी दारुची विक्री तेजीत सुरू असल्याचे चित्र असतानाच या संदर्भात गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.३१ मार्च रोजी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील वाघ्रण वाडी भागात पश्चिम व उत्तर दिशा जंगल परिसरात नागोठणे पोलीस ठाण्यातील हे.कॉ. विनोद पाटील,हे.कॉ. चंद्रकांत पाटील, पो.ना. निलेश कोंडार, पो.कॉ. रामनाथ ठाकूर, पो.कॉ. निशांत पिंगळे यांच्या पथकाने प्रतिबंधात्मक छापा टाकून यात गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या उध्वस्त केल्या असून त्यात सुमारे २०० लिटर क्षमतेचे प्लास्टिक ३ ड्रम मिळून आले त्यात साधारणता ६०० लिटर गुळमिश्रित असलेले ४० रुपये दराने अनधिकृत विक्री होणारे रसायन मिळून आले त्याची किंमत २४००० रुपये किमतीचा माल मिळून आला तसेच दोन लोखंडी टाक्या मिळून आल्या त्यात साधारणता ४०० लिटर गुळमिश्रित रसायन मिळून आले त्याची किंमत १६००० रुपये असून एकूण मिळालेल्या मालाची एकूण किंमत ४०००० रुपये अशी आहे. दरम्यान वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने प्रतिबंधात्मक छापा टाकून हस्तगत केलेला सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी दिली.
या गावठी दारुमुळेच या विभागातील अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. तर या गावठी दारूच्या आहारी बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे नागोठणे पोलीसांकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाई बद्दल नागोठणेसह ऐनघर विभागातील महिला वर्गातून तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.